लातूर : प्रतिनिधी
येथील ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शैक्षणिक सहलीत विद्यार्थ्यांनी बेंगळुरू येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि विश्वेश्वरैया औद्योगिक व तंत्रज्ञान संग्रहालय येथे उत्साहपूर्ण भेट दिली. अवकाश संशोधनापासून आधुनिक तंत्रज्ञानापर्यंतच्या ज्ञानविश्वाचा थेट अनुभव घेण्याची ही विद्यार्थ्यांसाठी अनोखी संधी ठरली. इस्रो भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी उपग्रह प्रक्षेपण प्रक्रिया, रॉकेट तंत्रज्ञान, तसेच भारताच्या ऐतिहासिक अवकाश मोहिमांची माहिती जाणून घेतली.
इस्रोच्या वैज्ञानिकांकडून मिळालेल्या प्रेरणादायी संवादामुळे विद्यार्थ्यांची विज्ञानावरील आवड आणखी वृद्धिंगत झाली. यानंतर विश्वेश्वरैया संग्रहालयातील वैज्ञानिक प्रयोगांचे जिवंत प्रात्यक्षिक, रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, अंतराळ विभाग आणि 3ऊ शो यांनी विद्यार्थ्यांचे अक्षरश: मन मोहून टाकले. आधुनिक तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष अनुभूती घेताना विद्यार्थ्यांच्या जिज्ञासेला नवचैतन्य लाभले. या शैक्षणिक सहलीचे नियोजनशाळेचे व्यवस्थापक अध्यक्ष सुजित बिरादार, रामेश्वरी कदम, प्रतीक्षा पाटील, कांबळे विशाल, कवीश्वर मडिले व ज्ञानेश्वर भामरे यांनी सर्व ठिकाणी मुलांची काळजी घेतली. सहल यशस्वी केल्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमेश बिरादार यांनी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे तसेच विद्यार्थ्यांना संपूर्ण विश्वासाने पाठवणा-या सर्व पालकांचे मन:पूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

