19.4 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्रघटनेच्या पदावर बसलेल्यांनी राजकीय पत्रकार परिषद घेतली

घटनेच्या पदावर बसलेल्यांनी राजकीय पत्रकार परिषद घेतली

संजय राऊतांची नार्वेकरांवर टीका

मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय कसे पायदळी तुडवले याचे प्रत्यक्ष पुरावे काल सादर करण्यात आले. त्यामुळे घटनेच्या पदावर बसलेल्या माणसाने राजकीय पत्रकार परिषद घेतली, अशी टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसेच लग्न एकदाच होते,लग्नाच्या प्रत्येक वाढदिवसाच्या वेळी सर्टिफिकेट घेऊन फिरावं लागत नाही, असा टोला देखील त्यांनी नार्वेकरांना लगावला आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पायदळी तुडवले, मनमानी केली. याचे प्रत्यक्ष पुरावे हे काल समोर आणले. राहुल नार्वेकरांनी नंतर राजकीय पत्रकार परिषद घेतली. ही हास्यास्पद होती. त्यांना मला सांगायचे आहे आपण वकील आहात आणि देवेंद्र फडणवीस देखील वकील आहेत. दोन वकिलांनी एकत्र बसावं आणि एकदा काय ते ठरवावे.

संजय राऊतांचा नार्वेकरांना खोचक टोला
लग्न एकदा होते. प्रत्येक लग्नाच्या वाढदिवसाला सर्टिफिकेट दाखवावे लागत नाही. तसेच घटना एकदा दिलेली असते. मग त्याच्यामध्ये जे बदल होत असतात ते आपण वेळोवेळी कळवत असतो. शिवसेनेने वेळोवेळी झालेले बदल घटनेमध्ये आणि ठराव कसे कळवले आहेत त्या संदर्भातील पोचपावत्या निवडणूक आयोगात पोहोचल्याचे पुराव्यासह काल दाखवल्या आहेत, असेही संजय राऊत म्हणाले. राहुल नार्वेकर रोज पक्षांतर करण्याच्या भूमिकेत आहेत. ते विधानसभा अध्यक्ष आहेत. या भूमिकेत अजून गेलेच नाहीत. दसरा मेळावा हा सुद्धा जनता न्यायालयात असतो. आपण सुद्धा त्या मेळाव्याला अनेकदा हजर राहिले आहेत, असे देखील संजय राऊत म्हणाले.

जनतेच्या पाठीत तुम्ही खंजीर खुपसला
माझे भाजपले खुले आव्हान आहे. जनतेसमोर या, निवडणुका होऊ द्या तुमची सत्ता जाईल. तुम्हाला जनता रस्त्यावर फिरणं मुश्किल करेल, साडेअकरा कोटी महाराष्ट्रातील जनतेच्या पाठीत तुम्ही खंजीर खुपसला आहे. महाराष्ट्राची अस्मिता आणि स्वाभिमान तुम्ही पायदळी तुडवला आहे. तुम्ही कसले मराठी माणूस? तुम्ही बकवास आहात? अशी टीका देखील संजय राऊतांनी केली आहे.

मिंध्याची शिवसेना ही पाकीटमारी
जागवाटपावर बोलताना संजय राऊत म्हणाले, खरी शिवसेना उद्धव ठाकरेंकडे आहे. आम्ही २३ जागा लढत आहोत. आधी सुद्धा लढत होतो आणि त्याच्यानंतरही लढू. ही खरी शिवसेना आहे. आताची मिंध्याची शिवसेना ही पाकीटमारी आहे. दुस-याचे पाकीट मारायचे आणि आपल्या खिशात ठेवायचे तशी शिवसेना फार काळ टिकणार नाही. शिंदे गटाच्या जागा मुंबईतले भांडवलदार आणि गुजरातचे उद्योगपती ठरवणार आहेत, असे देखील संजय राऊत म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR