लातूर : प्रतिनिधी
शहर महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीमती मानसी यांनी स्वच्छता विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेऊन वरवंटी कचरा डेपो येथील कचरा प्रक्रिया केंद्रास भेट दिली. कामकाजाची पाहणी केली.
वरवंटी कचरा डेपो येथे सुरू असलेल्या ओला कचरा प्रक्रिया, सुका कचरा प्रक्रिया, बायोगॅस व इतर कामाची पाहणी करुन त्यांनी समाधान व्यक्त केले. पाहणी दरम्यान ओल्या कच-यापासून बायोगॅसद्वारे तयार होणा-या विजेचा वापर व त्याचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना केल्या. दैनंदिन जमा होणा-या ओला व सुका कच-यावर प्रक्रिया होऊन त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावावी व त्याचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या. सदरील पाहणी दरम्यान उपायुक्त वसुधा फड, मुख्य स्वच्छता अधिकारी कलीम शेख, स्वच्छता विभाग प्रमुख रमाकांत पिडगे, कनिष्ठ अभियंता गणेश देवणीकर, वरवंटी कचरा डेपो प्रमुख आशिष साठे, शहर समन्वयक रोहित पांचाळ व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

