लातूर : प्रतिनिधी
गरजू व गरीब नागरिकांना हक्काचे घर मिळावे यासाठी लातूर ग्रामीणमध्ये घरकुल आवास प्लस सर्वेक्षण सुरु असून ही मोहीमह्याअज दि. १५ मे पर्यंत सुरू राहणार आहे. या मोहिमेपासून एकही गरजू कुटुंब वंचित राहू नये, याची योग्य ती दक्षता प्रशासनाने घ्यावी, असे माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी सांगितले.
घरकुल आवास प्लस सर्वेक्षणाच्या मोहिमेची मुदत गुरुवारी संपत आहे. या पार्श्वभूमीवर माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांच्याशी चर्चा केली. सर्वेक्षणाची मोहीम अधिक कार्यक्षमतेने लातूर ग्रामीणमध्ये राबवली जावी, असे माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी सांगितले. तसेच, सर्वेक्षणास मुदतवाढ मिळण्यासाठी सरकारकडे पत्राद्वारे मागणी केली. ज्या लाभार्थ्यांचे अद्याप सर्वेक्षण झाले नाही, अशांनी आपल्या ग्रामसेवकांशी संपर्क साधून त्वरित सर्वेक्षण पूर्ण करून घ्यावे. सर्वेक्षणासाठी पुन्हा मुदतवाढ मिळेल, असे समजून याकडे दुर्लक्ष करू नये. ग्रामस्थानी घरकुलाच्या नोंदणीसाठी पुढे यावे, असे माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी सांगितले.