घरचा आहेर मानाचा असतो, राजकारणात तो अपमानाचा ठरतो. ‘हातच्या काकणाला आरसा कशाला?’असे म्हणतात पण राजकारणात तो दाखवावा लागतो. त्याशिवाय आपल्या पायाखाली काय जळतेय ते दिसत नाही, कळत नाही. असाच आरसा भाजपचे ज्येष्ठ नेते व विधान परिषदेचे सदस्य संदीप जोशी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दाखवला आहे. संदीप जोशी हे मुख्यमंत्री फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. संघटनात्मक कामकाजात त्यांचा दीर्घ अनुभव असून, भाजपच्या जडणघडणीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. संदीप जोशी यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेण्याची घोषणा केल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सध्याची राजकीय संस्कृती, वारंवार होणारी पक्षांतराची प्रक्रिया आणि निष्ठावान कार्यकर्त्यांवर होत असलेला कथित अन्याय याबाबत त्यांनी परखड शब्दांत आपली भूमिका मांडली आहे. आपल्या आमदारकीची मुदत १३ मे रोजी संपल्यानंतर कोणतेही राजकीय किंवा शासकीय पद स्वीकारणार नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे जाहीर केले आहे. ही घोषणा केवळ वैयक्तिक निर्णय नसून, आजच्या राजकारणातील बदलत्या प्रवाहांवर भाष्य करणारी असल्याचे मानले जात आहे. संदीप जोशी यांनी अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय विश्लेषकांमध्ये विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
पक्षाशी निष्ठा राखून काम करणा-या कार्यकर्त्यांना योग्य सन्मान व संधी न मिळाल्याची खंत त्यांनी यापूर्वीही अप्रत्यक्षपणे व्यक्त केली होती. जोशी यांच्या मते, सध्याच्या राजकारणात मूल्यांपेक्षा संख्याबळ व सत्ताकारणाला अधिक महत्त्व दिले जात असून त्यामुळे मूळ विचारधारेला तडा जात आहे. पक्षांतराच्या राजकारणामुळे जनतेचा लोकशाही व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत स्वत:च्या मूल्यांशी तडजोड न करता राजकारणातून सन्मानपूर्वक बाजूला होणे, हाच योग्य मार्ग असल्याचा निर्णय आपण घेतल्याचे त्यांनी सूचित केले आहे. संदीप जोशी यांच्या निवृत्तीच्या घोषणेमुळे भाजपसह संपूर्ण राज्याच्या राजकारणात नवा चर्चा विषय निर्माण झाला आहे.एकीकडे त्यांच्या निर्णयाचे कौतुक होत असताना, दुसरीकडे अनुभवी व विचारशील नेतृत्वाच्या माघारीमुळे निर्माण होणारी पोकळी कशी भरून निघणार, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. भाजप नेते, विधान परिषदेचे सदस्य संदीप जोशी हे नागपूरचे आहेत.
त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेण्याची घोषणा केल्यानंतर त्यांच्या निवासस्थानाबाहेर भावनिक वातावरण निर्माण झाले. त्यांच्या निर्णयाचे वृत्त समजताच मोठ्या संख्येने भाजप समर्थक व कार्यकर्ते तेथे जमा झाले आणि राजकीय संन्यासाचा निर्णय मागे घ्यावा, अशी कळकळीची मागणी जोशी यांना केली. अनेक कार्यकर्त्यांना आपल्या नेत्याच्या निवृत्तीच्या विचाराने अश्रू अनावर झाले होते. तर काहींनी घोषणाबाजी करत जोशी यांच्या नेतृत्वावर असलेला विश्वास आणि प्रेम व्यक्त केले. कार्यकर्त्यांनी यावेळी जोशी यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. पक्षासाठी त्यांनी केलेल्या प्रदीर्घ कार्याची आठवण करून देत, त्यांच्या अनुभवाची व मार्गदर्शनाची पक्षाला नितांत गरज असल्याचे कार्यकर्त्यांनी ठासून सांगितले. जोशी यांचा निर्णय केवळ वैयक्तिक नसून, हजारो निष्ठावान कार्यकर्त्यांच्या भावना त्याच्याशी जोडल्या गेल्या असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री दावोस दौ-यावरून परतल्यानंतर जोशी यांनी आपल्या निवृत्तीबाबत अंतिम निर्णय घ्यावा अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. फडणवीस यांच्या हस्तक्षेपानंतर जोशी आपला निर्णय मागे घेतील अशी त्यांच्या समर्थकांना आशा वाटते. सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय आपण सहज किंवा अचानक घेतलेला नसून, दीर्घकाळच्या आत्मचिंतनातून तो पुढे आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राजकारण हे आपल्यासाठी कधीही पद, सत्ता किंवा प्रतिष्ठेचे साधन नव्हते, तर समाजसेवा, विचारनिष्ठा आणि प्रामाणिक कार्याची वाट होती असे त्यांनी म्हटले आहे. जोशी यांनी एका पत्राद्वारे आपली भावना व्यक्त केली आहे. सध्याच्या राजकीय वातावरणावर भाष्य करताना जोशी यांनी सत्तेसाठी सुरू असलेली पक्षांतराची प्रवृत्ती, संधिसाधूपणा आणि वाढती स्पर्धा यामुळे केवळ सामान्य मतदारच नव्हे, तर निष्ठावान कार्यकर्तेही अस्वस्थ होत असल्याची खंत व्यक्त केली आहे. मर्यादित संधी आणि वाढलेल्या अपेक्षांमुळे कुणाचीच थांबण्याची तयारी नसल्याची वास्तववादी मांडणी त्यांनी केली आहे.
आपण आजही स्वत:ला भाजपचा एक सामान्य कार्यकर्ता मानत असलो, तरी या बदलत्या चित्राकडे पाहता आपणच बाजूला होणे अधिक योग्य ठरेल, असा विचार हळूहळू मनात ठाम होत गेल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपल्या वयाचा आणि पुढील पिढीचा विचार व्यक्त करत जोशी यांनी आणखी एक महत्त्वाची भूमिका मांडली आहे. वयाच्या ५५ व्या वर्षी स्वत:ची जागा रिक्त करून तरुण, ऊर्जावान नेतृत्वाला पुढे येण्याची संधी देणे हे पक्षाच्या दीर्घकालीन हितासाठी आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे आपल्या पुढील राजकीय वाटचालीला पूर्णविराम देण्याचा निर्णय आपण अत्यंत शांतपणे आणि संपूर्ण विचारांती घेतल्याचे त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे. पक्षाशी असलेली आपली नाळ अधोरेखित करताना संदीप जोशी यांनी भाजपनेच आपल्याला घडविले, संधी दिल्या आणि ओळख निर्माण करून दिली, याची कृतज्ञतापूर्वक जाणीव व्यक्त केली आहे. याच भावनेतून त्यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर माफी मागितली असून, कोणालाही दुखावण्याचा आपला हेतू नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
जोशी यांचे हे पत्र केवळ वैयक्तिक निवृत्तीची घोषणा नसून, सध्याच्या राजकीय संस्कृतीवर केलेले परखड आणि आत्मपर परीक्षण म्हणून याकडे पाहिले जात आहे. राजकारणातून निवृत्त झाल्यानंतरही सामाजिक जीवनापासून दूर न जाण्याची भूमिका जोशी यांनी स्पष्ट केली आहे. यापुढे आपण सर्वसामान्य सामाजिक कार्यकर्ता म्हणून आयुष्य व्यतीत करणार असून, समाजातील सामान्य घटकांची सेवा करणे आणि त्यांच्या प्रश्नासाठी कार्य करणे हेच आपले प्रमुख ध्येय राहील असे सांगून पदाशिवायही समाजासाठी काम करता येते, हा विश्वास त्यांनी या निर्णयातून व्यक्त केला आहे. आपण यापुढे सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील कार्य अधिक व्यापकपणे सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आपल्या निर्णयामागील भावनिक व वैचारिक भूमिका मांडताना जोशी म्हणाले, ‘काळ कोणासाठी थांबत नसतो, तो अखंड पुढे सरकत असतो.’ त्यांच्या या विचारावर अन्य पक्षातील नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे व्यक्त होणे आवश्यक आहे.

