परभणी : ऐन दिवाळीत सणाची धामधुम सुरू असताना परभणी शहरामध्ये निरनिराळ्या भागात घरफोड्या करणा-या अट्टल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्याच्याजवळून ३ लाख २२ हजार १८० रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
शहरातील उत्तम नेमाजी भुजबळ (रा. लोकमान्य नगर परभणी), अखिलेश नंदकुमार वैद्य (रा. श्रीराम नगर, परभणी) आणि विजय पांडुरंग जांबुतकर (रा. आनंद नगर, परभणी) यांच्या घरात चोरी झाली होती.
त्यांनी दिलेल्या घरफोडीच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर.यांनी आरोपींचा शोध घेऊन हे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत स्था.गु.शा. च्या पथकाला आदेश व सुचना दिल्या होत्या. त्यावरून तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे व गोपनीय माहितगारांच्या मदतीने त्या भागातील संशयितांचा शोध घेऊन स्था.गु.शाच्या पथकाने बबलूसींग गोपालसिंग टाक (वय ४०) रा.दत्तनगर, कारेगाव रोड या आरोपीस ताब्यात घेतले.
त्याने शहरातील तीन गुन्हे केल्याचे कबूल केले असून त्याच्याकडून ३ लाख ३ हजार ७८० रुपयांचे सोन्याचे दागिने, ६ हजार ५०० रुपयांचा १ ओनिडा कंपनीचा कलर टिव्ही, घरातील देवपुजा करण्याचे १ हजार ७०० रुपयांचे तांब्याचे पात्र, ७०० रुपयांचे तांब्याचे गडवे, २ हजार ५०० रुपयांची विद्युत शिलाई मशीन, २ हजार ५०० रूपयांची इलेक्ट्रिक कामासाठी वापरली जाणारी ड्रील मशीन, ८ हजार २०० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि ३१० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा
एकूण जवळपास ३ लाख २२ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
पोलीस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर., अपर पोलिस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा.चे पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण, सपोनि पी.डी. भारती, पोउपनि अजित बिरादार, गोपीनाथ वाघमारे, पोलिस अंमलदार बालासाहेब तुपसुंदरे, विलास सातपुते, विष्णु चव्हाण, मधुकर ढवळे, भदरगे, दिलावर पठाण, निलेश परसोडे, रफियोद्दीन शेख, आशा सावंत, जयश्री आव्हाड, हुसेन पठाण, संजय घुगे, मुरकुटे यांनी ही कारवाई केली.