माजी खा. शेवाळे यांचे गृहमंत्री अमित शाह यांना पत्र
मुंबई : प्रतिनिधी
बांगलादेश आणि म्यानमारमधून अवैध रीतीने महाराष्ट्रात येणा-या घुसखोरांविरोधात त्वरित योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने दिले आहेत. महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव, पोलिस महासंचालक आणि अन्य संबंधित यंत्रणांना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून हे निर्देश देण्यात आले. शिवसेना उपनेते आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांनी बांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाई करण्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मागणी केली होती. दरम्यान, या मागणीची दखल घेत केंद्रीय गृहमंत्रालयाने कारवाईचे निर्देश दिले.
दरम्यान, अभिनेता सैफ अली खानवर बांगलादेशी घुसखोरांकडून झालेल्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच केंद्रीय गृह मंत्रालयाच्या या आदेशाने घुसखोरांच्या विरोधातील कारवाईला वेग येण्याची शक्यता आहे. शिवसेना उपनेते आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांनी २८ नोव्हेंबर २०२४ रोजी गृहमंत्री अमित शहा यांना लिहिलेल्या निवेदनात टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या संस्थेकडून घुसखोरांविषयी केलेल्या सर्वेक्षणाचा उल्लेख केला होता. या सर्वेक्षणानुसार मुंबईत बांगलादेशी आणि म्यानमारमधून आलेल्या घुसखोरांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे अनेक ठिकाणी कायदा सुव्यवस्था बिघडली असून गंभीर सामाजिक आणि आर्थिक समस्या उद्भवल्या आहेत. काही राजकारण्यांकडून अशा घुसखोरांचे वोट बँक म्हणून लांगूलचालन सुरू आहे. भारतात आलेल्या या लोकांमुळे स्थानिकांच्या रोजगारावरही परिणाम होताना दिसत आहे.
अवैध सामाजिक संस्था
पुरवितात रसद : शेवाळे
शेवाळे यांनी घोसखोरांमुळे होणा-या गंभीर समस्यांकडे लक्ष वेधले आहे. १९६१ च्या जनगणनेनुसार मुंबईत हिंदूंची लोकसंख्या ही ८८ टक्के होती. २०११ च्या जनगणनेत हिंदूंची लोकसंख्या ६६ टक्क्यांपर्यंत घसरली. हीच टक्केवारी २०५१ पर्यंत ५४ टक्क्यांवर पोहोचेल, अशी भीती शेवाळे यांनी आपल्या पत्रात व्यक्त केली आहे. तसेच काही नोंदणीकृत नसलेल्या अवैध सामाजिक संस्था या घुसखोरांना रसद पुरवत असल्याचा थेट आरोपही शेवाळे यांनी केला.