मुंबई पोलिसांना हायकोर्टाचा धक्का
मुंबई : प्रतिनिधी
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आलेला आहे. या प्रकरणात घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्विनी यांनी केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने स्वीकारली. मुंबई पोलिसांनी तपासात केलेल्या त्रुटी दखलपात्र असल्याचे न्यायालयाने म्हटले असून, तपास सीबीआयकडे सोपविण्याचे आदेश दिले. न्यायालयाचा आदेश पोलिसांसाठी मोठा धक्का आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी सुनावणीदरम्यान तपासातील त्रुटींची दखल घेतली. फेब्रुवारी २०२४ मध्ये एका फेसबुक लाईव्हदरम्यान घोसाळकर यांची हत्या झाली. त्यांची हत्या केल्यानंतर आरोपी मॉरिस नोरोन्हाने स्वत:वर गोळीबार करत आत्महत्या केली. अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा, अशी मागणी त्यांच्या पत्नी तेजस्विनी यांनी याचिकेच्या माध्यमातून उच्च न्यायालयाकडे केली होती. पोलिसांकडून तपासात हलगर्जीपणा झाल्याचा, त्यांच्यावर राजकीय दबाव असल्याचा दावा घोसाळकरांनी याचिकेत केला होता. त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांची न्यायालयानं दखल घेतली. तपासाची कागदपत्रे २ आठवड्यांच्या आत सीबीआयकडे वर्ग करा, असे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले. यासोबतच या प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयच्या विभागीय संचालकांनी आयपीएस अधिका-याची नियुक्ती करावी. हा अधिकारी पोलिस अधीक्षक दर्जाच्या खालील नसावा, अशा सूचना न्यायालयाने दिल्या.