नाशिक : शाखाप्रमुख, नगरसेवक, महापालिकेत विरोधी पक्षनेता, आमदार, मंत्री आणि चारवेळा सलग खासदार राहिलेल्या शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे ग्रह फिरले आहेत की काय? अशी काहीसी परिस्थिती निर्माण झाली. जिल्ह्यातील दुसरे नेते अंबादास दानवे यांच्याशी सातत्याने उडणारे खटके, डावलले जात असल्याची भावना, लोकसभा निवडणुकीत सलग दोनवेळा पराभव असा वातावरणात खैरे स्वत:ला असुरक्षित समजू लागले. यातूनच अंबादास दानवे यांच्यावर टीका, आरोप करत चंद्रकांत खैरे यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेऊन तक्रार केली.
खैरे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचा मान राखलाच गेला पाहिजे, अशी समज ठाकरेंनी अंबादास दानवे यांना दिली. तर पक्ष अडचणीत असतांना तुमच्यामध्ये वाद नको, ते योग्य नाही, अशी समजूत खैरेंची काढली. यात उद्धव ठाकरेंचे झुकते माप कोणाला याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. तिकडे नाशिकमध्ये पक्षाच्या शिबीरात मात्र संजय राऊत यांनी चंद्रकांत खैरे यांचे तोंडभरून कौतुक केले. ठाकरेंकडून समजूत अन् राऊतांकडून कौतुक झाल्याने खैरेचे अजूनही पक्षात वजन कायम असल्याचे दिसून आले.
त्याचे झाले असे की, नाशिकमध्ये शिवसेनेचे निर्धार शिबिर आयोजित करण्यात आले आहे. खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत ‘आम्ही इथेच’या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यात राजन विचारे, राजाभाऊ वाजे, अरविंद सावंत,चंद्रकांत खैरे हे सहभागी झाले होते. या नेत्यांची संजय राऊत यांनी मुलाखत घेत त्यांच्या शिवसेनेतील प्रवास, संघर्ष आणि राजकारण या विषयावर जाहीर मुलाखत घेतली. चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्या नुकत्याच झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राऊत खैरेंना काय विचारतात? याकडे सगळ्यांचे लक्ष होते.
पण संजय राऊत यांनी चंद्रकांत खैरे यांचा उल्लेख करतानाच खैरे आलेत, ते हिंदुत्वाचा मूर्तिमंत चेहरा आहेत. त्यांना बघितले तर शंकराचार्यांची आठवण येते, ते शिवसेनेचे शंकराचार्य आहेत. औरंगजेबची कबर आहे, ते तिथून येतात. कडवट शिवसैनिक आहे, असे म्हणत हा कडवटपणा आला कुठून? असा प्रश्न त्यांना केला. यावर मी मार्मिक मुळे शिवसेनेत आहे. वडील मार्मिक वाचायचे त्यामुळे शिवसेनेत आलो. शाखा स्थापन केली.