चंद्रपूर : सर्वांनाच आवडणा-या पनीरच्या नावाखाली चक्क चीज अॅनालॉग नावाच्या घातक पदार्थाची चंद्रपुरात विक्री सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव शुक्रवारी (दि. ७) धाडसत्रातून पुढे आले. अन्न व औषध प्रशासनाने दोन वेगवेगळ्या कारवायांत तब्बल १ लाख ५० हजार २०० रुपयांचा (४७२ किलो ग्रॅम) पनीर साठा जप्त केला आहे.
अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी जी. टी. सातकर यांनी बुधवारी (दि. ५) चंद्रपूर येथील सपना डेली निड्सची तपासणी केली. त्यावेळी या दुकानात चीज अॅनालॉग हा अन्नपदार्थ पनीर म्हणून विक्री करीत असल्याचे समोर आले. पथकाने दुकानातून ५१ हजार २०० रुपये किमतीचा १९७ किलो ग्रॅम साठा जप्त केला. गोलबाजार परिसरातील तिलक मैदानात न्यू भाग्यश्री घी भंडारातून ९९ हजार रुपये किमतीचा पनीर म्हणून विक्री केला जाणारा २७५ कि.ग्रॅ. चीज अॅनालॉग हा घातक पदार्थ जप्त करण्यात आला. अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईने चंद्रपुरातील विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. उन्हाळा सुरू झाल्याने दुग्धजन्य पदार्थ व पनीर आदी पदार्थांचे डिमांड वाढले आहे. त्यामुळे काही विक्रेते भेसळ करून विक्री करण्याची शक्यता आहे.
ग्राहकांनो, जागरूक व्हा
सध्या लग्नसराईला असल्याने पनीरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे नफा मिळविण्यासाठी विक्रेते आरोग्याला हानीकारक असलेल्या चीज अॅनालॉगची विक्री करीत आहेत. त्यामुळे ग्राहकांनी कोणतेही अन्नपदार्थ खरेदी करताना जागरूक राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
४७२ किलोग्रॅम बनावट पनीर जप्त
चंद्रपुरात दोन दुकानांत बनावट पनीर आढळल्याने अन्न व औषध प्रशासन आता सर्वच दुकानांची तपासणी करत आहे.
जप्त नमुने प्रयोगशाळेत
दोन्ही कारवायांत अन्न व औषध प्रशासनाने जप्त केलेल्या ४७२ कि. ग्रॅ. पनीरमध्ये चीज अॅनालॉगचे नमुने आढळून आले. या नमुन्यांचे विश्लेषण करण्यासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. अन्नपदार्थांचा विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर अहवालाच्या अनुषंगाने अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६, नियम व नियमन २०११ नुसार संबंधित दुकानदारांवर कारवाई करण्यात येणार आहे.