29.7 C
Latur
Wednesday, February 5, 2025
Homeमहाराष्ट्रचंद्रपूरमध्ये बर्ड फ्लूची एन्ट्री

चंद्रपूरमध्ये बर्ड फ्लूची एन्ट्री

१० किलोमीटर परिसर अलर्ट झोन जाहीर यंत्रणांची उडाली धावपळ

चंद्रपूर : प्रतिनिधी
राज्यातील लातूर, ठाणे या भागात बर्ड फ्लूने डोकेदुखी वाढवली असतानाच आता चंद्रपूरमध्ये या रोगाची एन्ट्री झाली आहे. प्रशासन सतर्क झाले आहे. पोल्ट्री फार्म मालकांनी तात्काळ उपाययोजना सुरू केल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील मंगली गाव आणि आजूबाजूच्या १० किलोमीटर परिसरात अलर्ट झोन जाहीर करण्यात आला आहे. संक्रमण रोखण्यासाठी जिल्हाधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने तातडीने बैठक घेत उपाययोजना सुरू केल्या आहेत.

वृत्तसंस्थेनुसार, २५ जानेवारी रोजी ब्रह्मपुरी तालुक्यातील मंगळी गावातील पोल्ट्री फार्मवर काही कोंबड्या दगावल्या. ही बाब प्रशासनाला समजताच पशुपालन विभागाने धाव घेतली. त्यांनी नमुने घेतले. नमुने पुणे आणि भोपाळ येथे पाठवण्यात आले. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यानुसार या कोंबड्यांना एव्हियन एन्फ्लूएंझा एच5एन1 झाल्याचे समोर आले आहे. अहवालानंतर प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. चंद्रपूर जिल्हाधिका-यांनी मांगली गाव आणि त्याच्या आजूबाजूचा १० किलोमीटर परिसर अलर्ट झोन जाहीर केला आहे. संक्रमण पसरू नये यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे.

संसर्गित कोंबड्या मारणार
मांगली, गेवलाचक आणि जुनोनाटोली या गावातील पोल्ट्री फार्मवर बर्ड रॅपिड रिस्पॉन्स टीम पोहोचली आहे. संसर्ग झालेल्या कोंबड्यांना आता नष्ट करण्यात येणार आहे. त्यांना योग्यरीतीने नष्ट करण्यात येईल. तर अंडे आणि पिलांना पण नष्ट करण्यात येणार आहे.

सर्व चिकन, मटन दुकाने सध्या बंद
संसर्ग रोखण्यासाठी या भागात दळणवळण थांबवण्यात आले आहे. या परिसरात चिकन विक्री, अंडे विक्रीस प्रतिबंध घालण्यात आला आहे. इतर पक्ष्यांना, पशूंना कोणताही धोका होऊ नये यासाठी कोंबड्या नष्ट करण्यात येत आहेत. या परिसरात सोडियम हायपोल्कोराईट वा पोटॅशियम परमॅग्नेटने स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. या परिसरातील सर्व चिकन, मटन दुकाने सध्या बंद करण्यात आली आहेत.

पोल्ट्री फार्म मालकांची डोकेदुखी वाढली
आता राज्यातील लातूरसह ठाणे, चंद्रपूर आणि इतर जिल्ह्यांत पोल्ट्री फार्मचालक आणि मालकांची चिंता वाढली आहे. तर अनेक हॉटेल्सवर आतापासूनच चिकन नको, अशी भूमिका ग्राहकांनी घेतली आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक आणि पोल्ट्री उद्योग आव्हानांना सामोरे जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR