नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशभरातील मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीची यादी आली आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म (एडीआर) ने देशभरातील मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीचा अहवाल दिला आहे. या अहवालानुसार तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री ठरले असून ममता बॅनर्जी यांच्याकडे सर्वात कमी संपत्ती असल्याचे दिसून येते.
या यादीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचाही समावेश आहे. या अहवालानुसार योगी आदित्यनाथ यांच्याकडे केवळ १.५४ कोटींची संपत्ती आहे. परंतु त्यांच्या शेजारच्या राज्याचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याकडे त्यांच्यापेक्षा चार पट जास्त संपत्ती आहे. पुष्कर सिंह धामी यांच्याकडे ४.६४ कोटींची संपत्ती आहे.
सर्वात कमी संपत्ती ममतांकडे : हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांच्याकडे ७.८१ कोटी रुपयांची संपत्ती आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंह मान हे १.९७ कोटी रुपये संपत्तीचे मालक आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्याजवळ १.६४ कोटी रुपये आहेत. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांच्याकडे १.४१ कोटींची संपत्ती आहे. १३ वर्षांपासून बंगालच्या मुख्यमंत्री असलेल्या ममता बॅनर्जी यांच्याकडे केवळ १५ लाखांची संपत्ती आहे. २०२१ मधील विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी १६.७२ लाख रुपये संपत्ती असल्याचा खुलासा केला होता. यामुळे त्यांची संपत्ती आता कमी झाल्याचे दिसत आहे.
ममता बनर्जी या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत. त्यापूर्वी त्या केंद्रीय मंत्री आणि खासदारही राहिल्या आहेत. त्यामुळे केंद्र सरकारकडून त्यांना महिन्याला ५० हजार रुपये पेन्शन मिळते. परंतु हे पेन्शन किंवा मुख्यमंत्रीपदाचा पगार ममता बॅनर्जी घेत नाहीत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांना २ लाख १० हजार रुपये पगार देण्याची तरतूद आहे.
चौकट
चंद्राबाबू यांच्याकडे ९३१ कोटींची संपत्ती
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यांच्याकडे ९३१ कोटी रुपयांची संपत्ती आहे. दुस-या क्रमांकावर अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पपेमा खांडू आहेत. त्यांच्याकडे ३३२ कोटींची संपत्ती आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैया तिस-या क्रमांकावर असून त्यांच्याकडे ५१ कोटी रुपयांची संपत्ती आहे.
फडणवीस यांच्याकडे १३.२७ कोटी
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याकडे २५.३३ कोटींची संपत्ती आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे १० कोटीपेक्षा जास्त संपत्ती आहे. त्यांच्याकडे १३.२७ कोटी रुपये संपत्ती असल्याचे एडीआरच्या अहवालात म्हटले आहे.