छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाची कारवाई
नारायणपूर : छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात शुक्रवारी सुरक्षा कर्मचा-यांशी झालेल्या चकमकीत ६ नक्षलवादी ठार झाले. अबुझमद परिसरातील जंगलात सुरक्षा दलाने ही कारवाई केली. यात ६ नक्षलवाद्यांचा खात्मा झाल्याचे सांगण्यात आले.
अबुझमद परिसरातील जंगलात नक्षलवादी असल्याची माहिती मिळताच शुक्रवारी दुपारी सुरक्षा दलाने शोध मोहीम हाती घेतली. त्यावेळी जंगलात जोरदार चकमक झाली. या चकमकीत ६ माओवाद्यांचे मृतदेह, एके-४७/ एसएलआर रायफल, इतर शस्त्रे, स्फोटके आणि दैनंदिन वापराच्या वस्तू जप्त करण्यात आल्या. ही कारवाई सुरूच असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, झारखंडमध्ये सेंट्रल कोलफिल्डस लि.च्या एका कर्मचा-याकडून एक कोटी रुपयाची खंडणी मागण्यात आली होती. या धमकीमागे भाकपच्या कोयल-शंख झोन कमिटीचे नाव समोर आले होते. आता या प्रकरणात पोलिसांनी ४ नक्षलवाद्यांना अटक केली. यामध्ये योगेंद्र गंझू ऊर्फ पवन गंझू या अत्यंत क्रूर नक्षलवाद्याचा समावेश आहे. याने एका जवानाच्या हौतात्म्यानंततर त्याचे पोट फाडून बॉम्ब पेरण्याचे क्रूर कृत्य केले होते.