31.6 C
Latur
Saturday, April 12, 2025
Homeसोलापूरचक्क कैद्यांकडून रस्त्यावरील खड्ड्याची खोदाई

चक्क कैद्यांकडून रस्त्यावरील खड्ड्याची खोदाई

सोलापूर जिल्हा कारागृहाचा प्रताप चार कैदी आणले कामासाठी कारागृहाबाहेर

सोलापूर : कारागृहात पिण्याचे पाणी कमी दाबाने येत असल्यामुळे चक्क कैद्यांकडूनच खड्ड्याची खोदाई करण्याचा प्रताप सोलापूर जिल्हा कारागृह प्रशासनाने केला आहे. त्यावरून मोठी खळबळ उडाली.

सोलापूर शहरात दूषित पाणीपुरवठ्याची समस्या केल्या काही दिवसांपासून उग्र रुप धारण करून आहे. अशातच किडवाई चौकात असलेल्या सोलापूर जिल्हा कारागृहातही कमी दाबाने, आळ्या मिश्रित व दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्याबाबत महापालिकेला कारागृह प्रशासनाने सांगितले तरीही त्यांच्याकडून नवीन जोडणीबाबत टाळाटाळ केली जात असल्याने बुधवारी दि. ९ एप्रिल रोजी कारागृहातील चार कैद्याकडूनच खड्डा खोदून घेतला व दोन इंची पाईपलाईन बसवण्याचा खटाटोप केला.

मात्र संबंधित प्रकार काही जागृत नागरिकांनी पत्रकारांना सांगितल्यावर पत्रकार तिथे पोहोचले. त्यांनी याबाबत कारागृह अधीक्षक प्रदीप बाबर यांना प्रश्न विचारला. तेव्हा त्यांनी कारागृहाला सध्या एक इंची पाणी पुरवठा वाहिनी आहे. ती कमी पडत असल्यामुळे दोन इंची करण्याची विनंती आम्ही महापालिकेला केली होती. जानेवारी महिन्यापासून अद्यापही महापालिकेचे कर्मचारी या ठिकाणी पाईपलाईन दुरुस्तीसाठी आले नाहीत. सध्या उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासत असल्याने आम्ही स्वतःच खड्डा खोदायचा निर्णय घेतल्याचे सांगितले.

वाढत्या उन्हामध्ये कैद्यांना पाण्याची गरज वाढते हे खरे आहे. मात्र त्यासाठी चक्क कारागृहातील बंदीवान कैद्यांना कारागृहाबाहेर आणून त्यांच्याकडूनच पाईपलाईनसाठी खड्डा करून घेण्याचा प्रकार कितपत योग्य आहे हा सवाल येथे निर्माण होत आहे. संबंधित ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असला तरी संधी साधून एखाद्या कैद्याने पलायन केले तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न विचारला जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR