जळगाव : प्रतिनिधी
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीचे अध्यक्ष रोहिणी खडसे यांच्यात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप झाले. रोहिणी खडसे यांनी चाकणकर यांची योग्यताच काढली. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
रोहिणी खडसे यांचे स्वीय सहाय्यक पांडुरंग नाफडे आणि त्यांच्या पत्नी सीमा नाफडे यांच्यात कौटुंबिक वाद आहे. या वादातून नाफडे यांनी पोलिसांत आपल्या पतीविरोधात तक्रार केली आहे. पती-पत्नीच्या या वादात राजकीय संधी म्हणून रोहिणी खडसे यांनाही गोवण्याचा प्रयत्न झाला.
महिला आयोगाच्या अध्यक्ष चाकणकर यांनीही जळगाव जिल्ह्याचा दौरा केला. या दौ-यात त्यांनी नाफडे यांच्या पत्नीची आवर्जून भेट घेतली. यावेळी चाकणकर यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत नाफडे यांनी रोहिणी खडसे यांचे समर्थक आपल्याला दमबाजी करतात असा दावा केला.
यावरून खडसे आणि चाकणकर यांच्यात चांगलीच राजकीय खडाजंगी सुरू आहे. रूपाली चाकणकर या आपल्या पदाचा राजकारणासाठी वापर करतात. पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाचविण्यासाठी आणि मदत करण्यासाठी त्या झटत असतात. त्यामुळे त्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी लायक नाहीत. त्यांच्याकडे ती पात्रता नाही. त्यामुळे चाकणकर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी खडसे यांनी केली.
श्रीमती नाफडे यांच्या वादाशी आपला काहीही संबंध नाही.
श्रीमती नाफडे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत माझा कुठेही उल्लेख नाही. मात्र चाकणकर यांनी आपल्या दौ-यात नाफडे यांना आपले नाव घेण्यास प्रवृत्त केले. त्यामुळेच श्रीमती नाफडे यांनी माझे नाव घेतले आहे. या संदर्भात कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जाण्यास आपण तयार असल्याचे श्रीमती खडसे यांनी सांगितले. यावेळी श्रीमती खडसे यांनी पुन्हा एकदा श्रीमती चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. चाकणकर यांनी त्याला रोखठोक प्रत्युत्तर देताना, श्रीमती खडसे यांनी माझी काळजी करू नये. मी महिला आयोगाने काय करावे, आणि त्याची जबाबदारी काय याबाबत सक्षम असल्याचे म्हटले आहे.