पुणे : प्रतिनिधी
हगवणे प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून होत असताना चाकणकर समर्थक आक्रमक झाले असून धमक्या देत आहेत, तसेच फोटो मॉर्फ करून बदनामी करत असल्याचा आरोप शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. या अनुषंगाने सुषमा अंधारे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एक खुले पत्र लिहित तक्रार केली आहे.
दरम्यान, पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली असतानाच, आता या प्रकरणात राज्य महिला आयोग आणि त्याच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर सडकून टीका केली जात आहे. या प्रकरणात राज्य महिला आयोगाने हलगर्जीपणा केल्यामुळे, विरोधी पक्षाकडून रूपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या प्रकरणातील राजकीय रंग आणखी गडद झाला आहे.
पत्रामध्ये सुषमा अंधारे यांनी अजित पवार यांना थेट प्रश्न विचारले आहेत. महिलांच्या सन्मानासाठी आणि संरक्षणासाठी महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर ज्यांना बसवले आहे, त्याच बाई जर हगवणे प्रकरणात प्रश्न विचारला म्हणून त्यांच्या या ब्लॅकमेलर गँगमार्फत इतक्या गलिच्छ पद्धतीने आमच्यावर टिप्पणी करत असतील, तर आम्ही न्याय आता कुणाकडे मागायचा? असा सवाल अंधारे यांनी पत्रातून विचारला आहे.
सुषमा अंधारे यांनी पत्रात पुढे म्हटले आहे की, रूपाली चाकणकर यांच्या समर्थक गँगकडून अनेक महिलांना धमक्यांचे आणि अश्लील शिवीगाळीचे फोन सुरू झाले आहेत. त्यातल्या काही कॉल रेकॉर्डिंग सकाळी रोहिणीताई खडसे यांनी वाजवून दाखवल्या. आता रूपाली चाकणकरांची गँग अशा गलिच्छ पद्धतीने फोटो मॉर्फ करून, आपण (सुषमा अंधारे), रोहिणी खडसे, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड यांना अत्यंत वाईट भाषेमध्ये टिप्पणी करत आहेत, असेही अंधारे यांनी नमूद केले आहे.