अमरावती : प्रतिनिधी
संततीसंख्येवरून सुरू झालेल्या वादावरून ओवेसींनी राणांच्या वक्तव्याला थेट प्रत्युत्तर दिले आहे. अमरावतीत जाहीर सभेत बोलताना ओवेसी म्हणाले की,तुम्ही चार नव्हे तर आठ मुले जन्माला घाला, आम्हाला त्याच्याशी काहीही देणेघेणे नाही. अशा शब्दांत त्यांनी नवनीत राणा यांच्या आधीच्या वक्तव्यावर निशाणा साधला.
अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून राष्ट्रीय नेत्यांच्या सभांमुळे प्रचाराला धार येताना दिसत आहे. याच दरम्यान एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी अमरावतीत जाहीर सभा घेत भाजप नेत्या नवनीत राणा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. राणा यांनी काही दिवसांपूर्वी एका मौलानाच्या विधानाचा संदर्भ देत ‘हिंदूंनी किमान चार मुले जन्माला घातली पाहिजेत’ असं वक्तव्य केलं. त्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. याच मुद्द्यावरून ओवेसींनी अमरावतीच्या सभेत पलटवार केला.
ओवेसींनी यावेळी द्वेषाच्या राजकारणावर टीका करत, अशा वक्तव्यांमुळे जनतेचे लक्ष रोजगार, महागाई आणि नागरी सुविधा यांसारख्या मूलभूत प्रश्नांपासून दूर नेले जात असल्याचा आरोप केला. निवडणूक काळात भावनिक मुद्दे उकरून काढून समाजात तेढ निर्माण केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
त्याचबरोबर, या सभेत ओवेसींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही टीकास्त्र सोडले. जे आपल्या काकांचे झाले नाहीत, ते जनतेचे काय होणार?’’ असा सवाल करत त्यांनी मतदारांमध्ये संदेश देण्याचा प्रयत्न केला. जुने राजकीय प्रतीक मागे टाकून नव्या पर्यायाला संधी देण्याची वेळ आली असल्याचे ओवेसी म्हणाले. म्हणजेच आता ‘घड्याळाची’ वेळ गेली असून ‘पतंग’ उडवण्याची वेळ आली आहे. असे वक्तव्य करत त्यांनी एमआयएमच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले.

