मुंबई : प्रतिनिधी
भाजप आमदार चित्रा वाघ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्यातील वाद वाढत आहे. माझ्या वडिलांची कारकीर्द आधी समजून घ्या, असा पलटवार रोहिणी खडसे यांनी वाघ यांच्यावर केला. दिशा सालियन मृत्यूप्रकरणी विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली होती. यावेळी चित्रा वाघ यांनी अनिल परबांसारखे ५६ पायाला बांधून फिरते, असे म्हटले होते.
चित्रा वाघ यांच्या या विधानाला हरकत घेत रोहिणी खडसे यांनी ट्विट केले होते. चित्रा वाघ यांचे वक्तव्य म्हणजे ‘बिग बॉस’मधील सीन असल्याची टीका रोहिणी खडसे यांनी केली होती. यावर माझी कामगिरी तुमच्या वडिलांना विचारा, ते माझ्यासमोरच बसतात, असे प्रत्युत्तर चित्रा वाघ यांनी दिले होते.
माझ्या वडिलांचं नाव घेऊन बोलण्याआधी त्यांच्या गेल्या ४० वर्षांच्या राजकीय कारकीर्दीची तरी माहिती घ्यावी! ते कोण आहेत, भाजप या पक्षासाठी त्यांचं योगदान काय, याची माहिती कृपा करून तुमच्या वरिष्ठ नेत्यांकडून जाणून घ्यावी आणि मग बोलावे.
चित्रा वाघ यांच्या वक्तव्याचा शनिवारी रोहिणी खडसे यांनी पुन्हा समाचार घेत एक्स सोशल मीडियावर म्हटले की, ‘माझ्या वडिलांचे नाव घेऊन बोलण्याआधी त्यांच्या गेल्या ४० वर्षांच्या राजकीय कारकीर्दीची तरी माहिती घ्यावी! ते कोण आहेत, भाजप या पक्षासाठी त्यांचं योगदान काय, याची माहिती कृपा करून तुमच्या वरिष्ठ नेत्यांकडून जाणून घ्यावी आणि मग बोलावे.
त्या झाडाच्या सावलीत माझ्या वडिलांचे कष्ट : खडसे
तुम्ही ज्या पक्षाकडून विधान परिषदेच्या सदस्या झाला आहात, त्या पक्षाला शून्यातून एका वटवृक्षात रुपांतर करण्यात, वाढवण्यात ज्या ठराविक लोकांची नावे घेतली जातात, त्यात माझ्या वडिलांचे नाव अग्रक्रमाने येते. चार पक्ष फिरून येऊन तुम्ही आरामात ज्या पक्षाच्या विधान परिषदेची जागा मिळवलीय ना आणि भाजपसारख्या भल्या मोठ्या वटवृक्षाच्या सावलीत आरामात बसलात ना, त्यात माझ्या वडिलांचे कष्ट आहेत. शेतकरी, दुर्लक्षित घटक, ओबीसी बांधव आणि शेवटच्या घटकापर्यंतच्या माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न करत ते इथवर आलेले आहेत. त्यामुळे आपण कुणाबाबत बोलतो हे लक्षात घेऊन बोला. उगाचच उचलली जीभ लावली टाळ्याला नको, अशा शब्दांत रोहिणी खडसे यांनी चित्रा वाघ यांच्यावर पलटवार केला.