अहिल्यानगर : प्रतिनिधी
कोल्हापूर सत्र न्यायालयाने अंतरिम जामीन अर्ज फेटाळल्यानंतर प्रशांत कोरटकरला अटक होणे अपेक्षित होते. पण त्याआधीच कोरटकर फरार झाला आहे. याच पार्श्वभूमीवर कोरटकरचा एक फोटो समोर आला असून त्यात तो दुबईला असल्याचे दिसत आहे. कोरटकर हा कोलकाता विमानतळावरून दुबईला पळून गेल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दुबईतील हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोरटकर हा दुबईला पळून गेला असेल तर, पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होईल.
याचसंदर्भात एनसीपी एसपीचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून गृह विभागावर शरसंधान केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान करणारा कोरटकर देशाबाहेर दुबईला पळून गेला की, पळवून लावला? रोल्स रॉयल फिरवणारा हा चिल्लर कोरटकर प्रायव्हेट जेटने गेला की, साध्या विमानाने गेला? असा खोचक प्रश्न त्यांनी विचारला आहे.
राज्यकर्त्यांचा मित्र असल्याने सगळ्या यंत्रणा कोरटकरच्या घरगडी असल्यासारख्या वागल्या, हे आता स्पष्ट झाले आहे. एका चिल्लर माणसाला वाचवण्यासाठी गृहखात्याने केलेला थिल्लरपणा आता उघड झाला असून सरकारने यावर तत्काळ स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. तथापि, पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्याने हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.