किव्ह : वृत्तसंस्था
रशिया-युक्रेन युद्ध तीन वर्षांपासून सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेत येताच एका दिवसात हे युद्ध संपवू, असा दावा केला होता. तसे झाले नसले तरी शांतता प्रक्रियेशी संबंधित चर्चा सुरू आहे. दरम्यान, या युद्धात चीनचा अँगलही समोर येत आहे.
युक्रेनला नष्ट करण्यासाठी रशिया आणि चीन एकत्र कट रचत आहेत का? युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी चीन रशियाला शस्त्रास्त्रांचा पुरवठा करत असल्याचा आरोप केला आहे. युक्रेनच्या सैनिकांनी रशियन सैन्यासोबत लढणा-या चिनी नागरिकांना पकडल्यानंतर हा दावा करण्यात आला आहे.
या चिनी सैनिकांनी सांगितले की, त्यांना पैशाचे आमिष दाखवून रशियात नेण्यात आले, पण तेथे त्यांची फसवणूक झाली. २० एप्रिलच्या ऑर्थोडॉक्स ईस्टरच्या सुमारास रशिया विजेच्या पायाभूत सुविधांवर नवीन हल्ले करू शकतो, असा इशारा झेलेन्स्की यांनी दिला आहे. चीन रशियाला बारूद आणि तोफगोळ्यांचा पुरवठा करत असल्याची आमच्या गुप्तचर यंत्रणेला पुष्टी मिळाली आहे, असे झेलेन्स्की यांनी गुरुवारी कीव्हमध्ये सांगितले. युक्रेनने पहिल्यांदाच स्पष्टपणे म्हटले आहे की, बीजिंग रशियाला शस्त्रास्त्रे देऊन युद्धात मदत करत आहे. यापूर्वी डोनेत्स्कमध्ये युक्रेनने रशियन सैन्याशी लढणा-या वांग ग्वांगजुन आणि झांग रेनबो या दोन चिनी नागरिकांना ताब्यात घेतले होते.
वांग यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘‘मी टिकटॉकवर रशियन सैन्यातील भरतीची जाहिरात पाहिली. कोव्हिड-१९ च्या काळात नोकरी गेल्यानंतर महिन्याला २०००-३००० डॉलर्सची ऑफर चांगली होती,’’ ते म्हणाले, पण रशियात आल्यावर त्यांचा फोन आणि बँक कार्ड काढून घेण्यात आले. रशियाने रासायनिक अस्त्रांचा वापर केला, पण युक्रेनच्या सैनिकांनी मला वाचवले आणि चांगले वागले.
वांग म्हणाले की, त्यांना रशियात नागरिकत्व देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, परंतु त्यांचा विश्वासघात करण्यात आला. त्यांनी आणि झांग यांनी स्पष्टपणे सांगितले की, ते चीन सरकारच्या वतीने आले नव्हते, तर पैशाच्या लोभापोटी रशियात गेले होते. रशियासाठी लढणारे शेकडो चिनी नागरिक आहेत, झेलेन्स्की म्हणाले, बीजिंगने हे आरोप फेटाळून लावले आणि युद्धात आपला सहभाग नसल्याचा आग्रह धरला.