नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारत-पाकिस्तान संघर्षादरम्यान चीनची लबाडी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली. आठवड्यापूर्वी चीनने भारतासोबत व्यापार वाढवण्यावर चर्चा केली. दुसरीकडे पाकिस्तानला उघड पाठिंबा दिला. पाकिस्तान वापरत असलेली शस्त्रास्त्रे देखील चीनची होती. पण, युद्धविरामानंतर भारताने चीनला चांगलाच धडा शिकवला. ज्याचा परिणाम ड्रॅगनवर ५ वर्षांपर्यंत दिसून येईल. या निर्णयामुळे पाकिस्तानला पाठिंबा दिल्याचा चीनला नक्कीच पश्चाताप होईल.
भारत आणि पाकिस्तानमधील युद्धविरामाच्या घोषणेनंतर, भारत सरकारने चीनला लक्ष्य केलं. चीनवर एक नवीन टॅरिफ बॉम्ब टाकला आहे. चीनमधून आयात केलेल्या टायटॅनियम डायऑक्साइडवर अँटी-डंपिंग शुल्क लादण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे शुल्क पुढील ५ वर्षांसाठी लादण्यात आले आहे. अर्थ मंत्रालयाने प्रति मेट्रिक टन ४६० ते ६८१ डॉलर दरम्यान अँटी-डंपिंग ड्युटी लागू केली आहे.
भारताच्या डीजीटीआर म्हणजेच व्यापार उपाय महासंचालनालयाला असे आढळून आले की, चीन देशात टायटॅनियम डायऑक्साइड अतिशय कमी किमतीत देत आहे, ज्यामुळे देशांतर्गत उद्योगाचे नुकसान होत आहे. त्यामुळे अँटी-डंपिंग शुल्क लादण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या क्षेत्रांवर होणार परिणाम
टायटॅनियम डायऑक्साइडचा वापर अनेक क्षेत्रांमध्ये केला जातो. यामध्ये रंग, प्लास्टिक, कागद, अन्न उद्योग यांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत सरकारच्या या निर्णयाचा परिणाम त्यांच्याशी संबंधित भारतीय कंपन्यांवर दिसून येईल. विशेषत: रंग व्यवसायाशी संबंधित भारतीय कंपन्या, ज्यात एशियन पेंट्स, बर्जर पेंट्स, शालीमार पेंट्स आणि इतर कंपन्यांचा समावेश आहे.