शांक्सी : वृत्तसंस्था
चीनमध्ये एक मोठा विनाशकारी स्फोट झाला. या भयानक स्फोटात अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मृतांचा आकडा अद्याप कळलेला नसला तरी, सुमारे १७ लोक या स्फोटात जखमी झाले आहेत. म्बुधवारी चीनच्या शांक्सी प्रांतातील एका निवासी संकुलात हा स्फोट झाला. हा हल्ला कोणी केला आणि कसा झाला याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
चीनच्या शांक्सी प्रांतातील एका निवासी भागात बुधवारी झालेल्या स्फोटामुळे भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. तैयुआनच्या झियाओडियन जिल्ह्यातील एका निवासी इमारतीजवळ हा स्फोट झाला. स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत.
स्फोटामुळे लागलेली आग दुपारी ३ वाजेच्या सुमारास आटोक्यात आली. स्फोटाचे कारण शोधण्यासाठी बचाव पथके बाधित इमारतीत घरोघरी जाऊन सुरक्षा तपासणी करत आहेत. या स्फोटाच्या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्फोटामुळे इमारतीखाली असलेल्या गाड्यांचे केवळ सांगाडे उरले आहेत. तर इमारतीमधील अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालं आहे.
दरम्यान, २६ एप्रिल रोजी इराणमधील सर्वात मोठ्या शाहिद राजाई बंदरावर एक भीषण स्फोट झाला होता. ज्यामध्ये ४० हून अधिक लोक ठार झाले तर सुमारे १२०० लोक जखमी झाले. चीनमधून आयात केलेल्या क्षेपणास्त्र इंधनामुळे हा स्फोट झाल्याचे म्हटले जात होते. त्यानंतर आता चीनमध्येच स्फोट झाल्याने विविध चर्चा सुरु झाल्या आहेत.