वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
अमेरिका आणि चीन यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. सेमीकंडक्टर तंत्रज्ञानावरून अमेरिका आणि चीनमध्ये तणाव वाढत आहे. अमेरिकेच्या संभाव्य नव्या निर्यात निर्बंधांविरोधात कारवाई करण्याचा इशारा चीनने दिला आहे. अमेरिकन प्रशासन चीनला चिपशी संबंधित निर्यातीवर बंदी घालण्याचा आणि २०० कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्याची योजना आखत आहे. त्यामुळे अमेरिका आणि चीन यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
प्रस्तावित निर्बंधांमध्ये सेमीकंडक्टर उपकरणे आणि एआय मेमरी चिप्सवरील निर्बंधांचा समावेश असेल. नवीन प्रस्ताव सुरुवातीला कमी गंभीर वाटतो, यात हुवावे पुरवठादारांना लक्ष्य केले गेले आहे आणि एआय मेमरी चिप विकासातील एक प्रमुख खेळाडू चांगशिन मेमरी टेक्नॉलॉजीजला काळ्या यादीतून वगळण्यात आले आहे.
या निर्बंधांचा फटका हुवावेचा भागीदार सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग इंटरनॅशनल कॉर्पोरेशन (एसएमआयसी) आणि सेमीकंडक्टर उत्पादन उपकरणांच्या उत्पादनात गुंतलेल्या १००हून अधिक चिनी कंपन्यांच्या मालकीच्या दोन चिप कारखान्यांवर होणार आहे.
रॉयटर्सने म्हटले की, कथित निर्बंधांबाबतचा निर्णय ट्रम्प प्रशासन घेईल, जे जानेवारीमध्ये बदलणार आहे. नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनमधून होणा-या सर्व आयातीवर अतिरिक्त शुल्क लावण्याचे आश्वासन दिल्याने व्यापारयुद्ध पेटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, त्यांचे प्रशासन सध्याच्या कोणत्याही शुल्काव्यतिरिक्त चीनमधून होणा-या सर्व आयातीवर अतिरिक्त १० टक्के शुल्क लागू करेल.