ढाका : वृत्तसंस्था
बांगला देशातील शेख हसीना यांचे सरकार पडल्यानंतर आता चीन भारताविरुद्ध कट रचत आहे. बांगलादेशमध्ये भारतविरोधी संघटनांना चीन भेटत असल्याच्या बातम्या येत आहेत. चीन बांगलादेशातील नवीन सरकार आणि इस्लामिक पक्षांशी मैत्री वाढवत आहे.
चीनचे राजदूत याओ वेन ढाका येथील जमात-ए-इस्लामी बांगलादेश पक्षाच्या कार्यालयात पोहोचले, तेथे त्यांनी पक्षाचे कौतुकही केले. चीनच्या राजदूताने सांगितले की, जमात-ए-इस्लामी हा एक सुसंघटित पक्ष आहे. बांगलादेशमध्ये जमात-ए-इस्लामी भारताला विरोध करते, शेख हसीना सरकारने त्यावर बंदी घातली होती, परंतु मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारने ही बंदी हटवली.
चीनच्या पाठिंब्याने जमात-ए-इस्लामी सत्तेत आला तर बांगलादेशात असे सरकार स्थापन होईल जे दहशतवाद, सीमा सुरक्षा आणि प्रादेशिक स्थैर्य या मुद्द्यांवर भारताच्या विरोधात असेल. नवीन सरकारमध्ये चीन बांगलादेशातील बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह प्रकल्पाला गती देऊ शकतो, जेणेकरून भारताचा प्रभाव कमी करता येईल. अंतरिम सरकारचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार तौहीद हुसैन यांनी जूनमध्ये भारतासोबत केलेले करार राष्ट्रीय हितसंबंधांनुसार नसतील तर त्यांचा पुनर्विचार केला जाईल, असे म्हटल्याची माहिती मिळाली होती.