लातूर : प्रतिनिधी
नळेगावच्या घरकुलाचा चुकीचा अहवाल देवून प्रशासनाची दिशाभूल करणा-या अधिका-यांना बडतर्फ करावे, या मागणीसाठी भारतीय दलित कोब्रा संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या समोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. नळेगाव ता. चाकूर जि.लातूर ग्रा.प.अंतर्गत २०१६-१७ मध्ये रमाई आवास योजनेअंतर्गत बालाजी गंगाराम कांबळे यांना घरकुल मंजूर झाले होते. तेंव्हा सदरील व्यक्ती नळेगाव येथील रहिवाशी नाही, त्याचे मतदान यादीत नाव नाही, त्यांच्या नावावर जागा नाही, त्याचे २००१ च्या प्रतिक्षा यादीत नाव नाही व ते घरकुल बांधकाम झाले नाही व अधिका-यांनी बिल उचलले अशी तक्रार भारतीय दलित कोब्रा संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे केली आहे.
या नावाची चौकशी न करता दुस-या नावाची चौकशी करून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे बोगस अहवाल दोन वेळेस पाठविण्यात आला. तेंव्हा त्यात विस्तार अधिकारी, पंचायत ग्रामविकास अधिकारी शिंदे बी.एस. व शेंडगे ए.एम. पठाण आय (स्था.अ.यं) यांनी बोगस आणि चुकीचा अहवाल दिल्याप्रकरणी चौकशी करून बडतर्फ करण्यात यावे. तत्कालीन ग्रामविकास अधिकारी व तत्कालीन स्थापत्य अभियंता यांना पण सेवेतून बडतर्फ करण्यात यावे. तसेच लाभार्थ्याचे पैसे शासनाच्या तिजोरीत भरून घ्यावेत संबंधीत अधिका-यावर निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी. या मागणीसाठी जिल्हा प्रकल्प संचालक यांच्या कार्यालयासमोर गुरूवार पासून भारतीय दलित कोब्रा संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे.

