लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरातील जय तुळजाभवानीनगरकडून मुख्य रस्त्याकडे जाणा-या अंतर्गत रस्त्यावरच दुस-या विकासकाच्या रेखांकनास मंजुरी देण्यात आल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. या संदर्भात वारंवार सूचना देऊनही त्यात दुरूस्ती केली जात नाही त्यामुळे नगर विकास खात्याने या गंभीर विषयाकडे लक्ष देऊन चुकीच्या पद्धतीने झालेले रेखांकन रद्द करून तुळजाभवानीनगरच्या नागरिकांना रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी विधानसभेत केली. सभापती राहुल नार्वेकर यांनी त्वरित कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत.
महाराष्ट्र विधिमंडळाच्या मुंबई येथे सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी शुक्रवार, दि. ४ जुलै रोजी लातूर शहरातील खाडगाव येथील जय तुळजाभवानीनगरमधील पश्चिम बाजूला सर्व्हे नंबर ८४ व ८२ असून हा सर्व्हे नंबर रिंग रोडला लागून आहे. या ठिकाणी बेकायदेशीरपणे रस्ता अडवून त्या रस्त्यात ‘ग्रीन बेल्ट’ दाखवला असल्याचा मुद्दा उपस्थित केला. लातूर शहर महानगरपालिकेने या चुकीच्या रेखांकनास मंजुरी दिली असून ती नागरिकांच्या मतेदेखील चुकीची आहे. सदरची मंजुरी देताना आणि रेखांकन मंजूर करताना लातूर शहर महापालिकेच्या वतीने अनेक महत्त्वाच्या बाबींचे योग्य अवलोकन केले गेले नाही, असाही आरोप रहिवाशांकडून होत आहे.
खाडगाव येथील जमिनीच्या संदर्भात सादर केलेल्या रेखांकनाला लातूर शहर महानगरपालिकेने मंजुरी दिली असून सदरची मंजुरी देताना आणि रेखांकन मंजूर करताना लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने कोणत्या बाबींचे अवलोकन केले गेले नाही, याची चौकशी शासनाने करावी तसेच जय तुळजाभवानीनगर येथील नागरिकांना खाडगाव रिंग रोडकडे जाण्यासाठी असणा-या रस्त्यावर झालेल्या या बेकायदेशीर अतिक्रमणामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. या प्रकरणात चुकीची कागदपत्रे दाखवून घेण्यात आलेली रेखांकन मंजुरी तात्काळ रद्द करावी, अशी मागणी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सभागृहात केली. या वेळी विधानसभा सभापती राहुल नार्वेकर यांनी या संदर्भात बोलताना, शासनाने या विषयाची नोंद घेऊन त्वरित उचित कार्यवाही करावी, असे निर्देश दिले आहेत.