मुंबई : प्रतिनिधी
यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे होते. मात्र आता विधान परिषदेचे नेते अंबादास दानवे यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्याबाबत गंभीर आरोप केला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान सट्टा लावल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केला. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये मुंबईतील काही पोलिस अधिका-यांचाही समावेश होता असेही अंबादास दानवे म्हणाले.
दरम्यान, न्यूझिलंडचा चार विकेट्स राखून भारतीय क्रिकेट संघाने पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे जेतेपद पटकावत ट्रॉफीवर आपले नाव कोरले.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पुन्हा एकदा परिषदेत पेनड्राईव्ह बॉम्ब फोडला. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मोठ्या प्रमाणात बेटिंग झाल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला. त्यानंतर आता इंडियन प्रीमियर लीगच्या सामन्यांमध्येही सट्टा लावण्यासाठी मुंबईत बैठका झाल्याचे अंबादास दानवे म्हणाले. यामध्ये मुंबई पोलिसांच्या बड्या अधिका-यांचाही समावेश असल्याचे अंबादास दानवे म्हणाले. आयपीएलच्या बेटिंगसाठी काही व्यक्ती मुंबईत आल्याची माहिती अंबादास दानवे यांनी सभागृहाला दिली. यावेळी अंबादास दानवे यांनी एक पेनड्राईव्ह देखील सादर केला.
पोलिसांच्या सहाय्याने सट्टा
लोटस २४ नावाचे क्रिकेट बेटिंग ऍप आहे. यातील मेहुल जैन, हिरेन जैन आणि कमलेश जैन हे बेटिंग करतात. पाकिस्तानातल्या लोकांशी, खेळाडूंशी यांचे संबंध आहेत आणि संपर्कात सुद्धा आहेत. ते खुलेआम मुंबईतल्या बड्या पोलिस अधिका-यांसोबत बैठक करतात. चॅम्पियन्स ट्रॉफी सामने संपल्यानंतर आता आयपीएलसाठी ते दुबईवरून मुंबईत आले आहेत. या पेनड्राईव्हमध्ये त्यांनी पाकिस्तानात बेटिंगसाठी काय काय केलेलं आहे हे तुम्ही ऐका. त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या पोलिस अधिका-याचे नाव घेतले आहे ते तुम्ही तपासा. खुलेआम पोलिसांच्या सहाय्याने अशा प्रकारच्या घटना या राज्यात घडत आहेत, असे अंबादास दानवे यांनी म्हटले.