प्रयागराज : वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात मौनी अमावस्येच्या अमृतस्रानावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत काही भाविकांचा मृत्यू झाला होता. आता या प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. पोलिसांना या प्रकरणी काश्मीरचं कनेक्शन दिसून आलं आहे.
या संशयित व्यक्तीला कौशांबी येथून पकडण्यात आलं आहे. सदर व्यक्ती काश्मीरमधील रहिवासी आहे. पोलिस आता त्याची सखोल चौकशी करत आहेत.
एटीएसने या संशयिताला कौशांबी जिल्ह्यातील सकाडा मोड येथून अटक केली. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संशयिताबाबत काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. चेंगराचेंगरी झाली त्या दिवशी संशयिताने आपल्या वायफाय डोंगलवरून इंटरनेट कॉल केला होता. ही बाब तपासाला अधिक गुंतागुंतीचे बनवत आहे. या संशयितासोबत आणखी काही लोक काश्मीरमधून प्रयागराज येथे पोहोचले होते. तसेच मौनी अमावस्येच्या रात्री त्रिवेणी संगमाजवळ उपस्थित होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित व्यक्ती आणि त्याचे सहकारी अनेक इंटरनेट कॉल करण्यासाठी वायफाय डोंगलचा वापर करत होते. हे कॉल्स एखाद्या कटासंदर्भात असू शकतात, ज्या माध्यमातून चेंगराचेंगरीसारखा प्रकार घडवून आणला असावा, असा या कॉल्सबाबत सुरक्षा यंत्रणांना संशय आहे.
स्थानिक पोलीस आणि एटीएसच्या टीमने संशयिताची चौकशी सुरू केली आहे. आता या चेंगराचेंगरीमागे त्याचा खरोखरच हात होता का, तो कुठल्या मोठ्या कटाचा भाग होता का? याचा तपास केला जात आहे.