पंढरपूर : प्रतिनिधी
पंढरपूरमध्ये चैत्री यात्रेची तयारी सुरु असून यात्रेनिमित्ताने भाविकांची पंढरपूरमध्ये गर्दी झाली आहे. तर मंदिर समितीच्या वतीने आलेल्या भाविकांसाठी सहा लाख बुंदी लाडू तयार करण्यात आले आहेत. उद्या चैत्री यात्रेचा सोहळा साजरा होत आहे. या निमित्ताने येणा-या भाविकांना प्रसाद म्हणून बुंदी लाडू अल्प किंमतीत उपलब्ध करून देण्यात आला आहे. यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे.
पंढरपूरमध्ये चैत्री यात्रोत्सव साजरा करण्यात येत असतो. या यात्रोत्सवानिमित्ताने राज्यभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणारा प्रत्येक भाविक दर्शन झाल्यानंतर श्रींचा प्रसाद म्हणून बुंदी व राजगिरा लाडू प्रसाद खरेदी करत असतो. या प्रत्येक भाविकांना लाडू प्रसाद मिळेल या दृष्टीने ६ लक्ष बुंदी लाडू व ६० हजार राजगिरा लाडू प्रसादाची उपलब्धी ठेवण्यात येत आहे.
अल्पदरात लाडूचा प्रसाद
यामध्ये बुंदी लाडू प्रसाद मंदिर समितीमार्फत व राजगिरा लाडू प्रसाद आऊटसोर्सिंग पद्धतीने खरेदी करण्यात येत आहे. ७० ग्रॅम वजनाचे दोन बुंदी लाडू कागदी पिशवीत पॅकिंग करून प्रति पाकीट २० रुपये प्रमाणे व २५ ग्रॅम वजनाचे दोन राजगिरा लाडू पॅकिंग करून प्रति पाकीट १० रुपये प्रमाणे भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे.
तीन स्टॉलवर रात्री १२ पर्यंत प्रसाद वाटप
बुंदी लाडू प्रसाद एमटीडीसी भक्तनिवास येथील लाडू उत्पादन केंद्रामध्ये हरभरा डाळ, साखर, शेंगदाणा डबल रिफाइंड तेल, काजू, बेदाणा, विलायची इत्यादी पदार्था पासून तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करून तयार करण्यात येत आहे. तयार करण्यात आलेल्या लाडूच्या प्रसादासाठी पश्चिम द्वार, उत्तर द्वार, श्री संत तुकाराम भवन असे एकूण तीन स्टॉल असून, सर्व स्टॉल सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत खुले ठेवण्यात येत आहेत.