अडीच लाखांवर वारकरी, प्रदक्षिणा मार्गावर भाविकांची गर्दी
पंढरपूर : विशेष प्रतिनिधी
अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या तीर्थक्षेत्र पंढरपूरच्या चैत्र यात्रा कामदा एकादशीच्या सोहळ््यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून सुमारे दोन ते अडीच लाख भाविकांनी उपस्थिती लावली. हरीनामाचा गजर, दिंड्या पताकांची दाटी आणि टाळ-मृदंगाच्या निनादात अवघी पंढरी दुमदुमून गेली. दर्शनबारीच्या दहा पत्रा शेडपैकी चार पत्रा शेडमध्ये भाविकांची गर्दी होती तर सहा पत्रा शेड रिकामेच होते. चंद्रभागा वाळवंट आणि प्रदक्षिणा मार्गावर भाविकांची गर्दी पाहायला मिळाली.
चैत्र सोहळ््यासाठी आलेला वारकरी भाविक प्रथम चंद्रभागेत स्रान करूनच विठ्ठल दर्शनाला जात असल्याने पहाटेपासूनच वारकरी भाविकांनी चंद्रभागेत स्नान करून श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी दर्शन बारीमध्ये हजेरी लावली. वारकरी जय हरी विठ्ठल व रामकृष्ण हरीच्या गजरात हातात पताका घेऊन दिंड्यात सहभागी होऊन नामदेव पायरीचे दर्शन घेऊन प्रदक्षिणा पूर्ण करीत होते. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांना तीन ते चार तासांचा कालावधी लागत होता.
युद्धाचे सावट, गॅस, पेट्रोल-डिझेलचा तुटवडा आणि उन्हाची तीव्रता या सर्वांमुळे पंढरपूरच्या चैत्र यात्रेवर परिणाम झाल्याचे दिसून आले. नेहमी पाच ते सहा लाख भाविकांची भरणारी यात्रा यंदा मात्र दोन ते अडीच लाखांवरच भरल्याचे दिसून आले.
दर्शन रांगेत पुरेशा सोयी सुविधा
श्री विठ्ठल व रुक्मिणीमातेचे पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी दर्शन रांगेत हजारो भाविक उभे होते. ही रांग सकाळी रिद्धी-सिद्धी पत्राशेडपर्यंत पोहोचली तर दुपारी चार नंबरच्या पत्रा शेडमध्ये भाविक होते. दर्शन रांगेतील भाविकांसाठी आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा मंदिर समितीमार्फत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विठ्ठल नामाच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला.
पत्राशेडमध्ये साबुदाण्याची
खिचडी, पाण्याची सोय
दर्शन रांगेतील एक ही भाविक उपाशी राहू नये म्हणून पत्रा शेड येथे साबुदाण्याची खिचडी, मिनरल वॉटर, सकाळी चहा, दुपारी लिंबू सरबत व सायंकाळी पुन्हा चहा मोफत वाटप करण्यात येत होते. दर्शन रांगेत चांगली स्वच्छता आणि पायाला खडी टोचू नये म्हणून मॅट, शौचालय, जलद व सुलभ दर्शनासाठी अनुभवी कमांडोची नियुक्ती करण्यात आली आहे.
श्री विठ्ठलास पुरणपोळीचा महानैवेद्य
चैत्र शुद्ध एकादशीचा उपवास असतानाही श्री विठ्ठलास पारंपरिक पुरणपोळीचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला. शेकडो वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा आजही भक्तिभावाने जपली जात आहे. परंपरेनुसार चैत्री एकादशीला भाविक पंढरीत श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन पुढे शिखर शिंगणापूर येथे जातात. तेथे भगवान शंकर व पार्वती यांच्या विवाह सोहळ््याचे आयोजन केले जाते. या विवाह सोहळ््यास साक्षात श्री विठ्ठल उपस्थित राहून पंचपक्वान्नांचे भोजन केल्याची आख्यायिका आहे. त्यामुळेच श्री विठ्ठलास पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो.

