लातूर : प्रतिनिधी
पोलीस ठाणे गांधीचौक हद्दी मधून रस्त्यावर उभी असलेली ट्रक मध्यरात्री चोरून नेल्याची घटना घडली होती. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे गांधी चौक दि. २१ जानेवारी रोजी गुन्हा दाखल झाला होता. सदरील चोरीला गेलेला ट्रक हस्तगत करण्यात गांधी चौक पोलीसांना यश आले आहे. सदर गुन्हा उघडकीस आणणे बाबत पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी आदेशित केले होते. त्यावरून पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी (लातूर शहर) भागवत फुंदे यांचे मार्गदर्शनात गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे यांचे नेतृत्वात पोलीस ठाणे गांधी चौक येथील पोलीस अधिकारी व अमलदारांचे पथक तयार करून त्यांना सखोल मार्गदर्शन व सूचना देण्यात आल्या होत्या. सदर पथकाकडून गुन्ह्या संदर्भात बारकाईने तपास सुरू असताना बातमीदार नेमून त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करून अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेण्यात येत होते.
वरिष्ठांचे मार्गदर्शनात सदरच्या पथकांनी केलेल्या परिश्रमामुळे पथकांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून औसा ते निलंगा जाणारे रोडवर लामजना गावाजवळ रोडवरून बेवारस थांबलेली, गुन्ह्यात चोरलेली ट्रक किंमत १५ लाख रुपये ही दिनांक २२ रोजी जप्त करण्यात आली असून ट्रक चोरणा-या आरोपीचा शोध सुरू आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे गांधी चौकचे पोलीस अमलदार पवार हे करीत आहेत.
सदरची कारवाई वरिष्ठांच्या यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे गांधी चौकचे पोलीस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस उपनिरीक्षक अक्रम मोमीन, पोलीस अमलदार उमाकांत पवार, दामोदर मुळे, राम गवारे, राजेंद्र टेकाळे, रणवीर देशमुख, मुकेश सूर्यवंशी, शिवा पाटील, संतोष गिरी, अनिल कज्जेवाड यांनी केली आहे.