31.6 C
Latur
Saturday, April 12, 2025
Homeमहाराष्ट्रछत्रपतींचा अवमान करणा-यांना टकमक टोकावरून लोटून दिले पाहिजे

छत्रपतींचा अवमान करणा-यांना टकमक टोकावरून लोटून दिले पाहिजे

रायगड : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणा-यांना टकमक टोकावरून लोटून दिले पाहिजे, अशी आक्रमक भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. मात्र, आपण लोकशाहीत आहोत. लोकशाही अनुरूप नियम करण्याचे काम करू, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना दिले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार सुनील तटकरे, मंत्री आशिष शेलार, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मंत्री भरत गोगावले, मंत्री आदिती तटकरे आणि महायुतीच्या नेत्यांनी रायगडावर अभिवादन केले.

यावेळी उदयनराजे यांनी गृहमंत्री शहा आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे काही मागण्या केल्या होत्या. त्यात राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त बोलणां-याविरोधात कडक कायदा करण्यात यावा. तो अदखलपात्र आणि किमान १० वर्षे त्याला जामीन मिळाला नाही पाहिजे. शिवरायांचा शासनमान्य इतिहास सरकारने प्रकाशित करावा, यासह काही मागण्या केल्या होत्या. त्या मागण्यांसंदर्भात कार्यवाही करू, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

अमित शहा शिवरायांचे सेवक
देवेंद्र फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि संपूर्ण मराठा साम्राज्याच्या इतिहासाचा ज्यांनी गाढा अभ्यास केला, जगभरातून इतिहासाचे पुरावे मिळवून या इतिहासाचे वाचन आणि लेखन करणारे अमित शहा हे रायगडावर आले आहेत. ते गृहमंत्री म्हणून नाही तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे सेवक आणि मराठा इतिहासाचे संशोधक म्हणून आले आहेत.

छत्रपती शिवराय हे आमचे दैवत
रघुजीराजे आंग्रे यांनी योग्य सांगितले, ज्यावेळी संपूर्ण देशात मोगलाई, कुतूबशाही, आदिलशाही होती, त्यावेळी या देशातले राजे आणि राजवाडे भंग पावत होते; मोडकळीस येत होते. लढून संपत होते. वाटत होते परकीय आक्रमकांचे राज्य संपणार नाही. एक अंध:कार झाला होता, कधीच पहाट होणार नाही, असे वाटत होते, तेव्हा आई जिजाऊंच्या आशीर्वादाने छत्रपती शिवरायांसारखा तेजस्वी सूर्य उगवला. त्या सूर्याने आपल्याला स्वराज्याची पहाट दाखवली. छत्रपती नसते, तर आपण कोणीच नसतो. छत्रपती शिवराय हे आमचे दैवत आहेत. त्यांच्यामुळे आम्ही स्वातंत्र्यात असून देव, देश आणि धर्माचे काम करत आहोत. आमच्यातील तेज जागृत करण्याचे काम छत्रपतींनी केले.

छत्रपतींमुळे देशावर भगव्याचा अंमल आला
शिवरायांनी अठरापगड जातींच्या लोकांना एकत्र करून त्यांच्यातले तेज प्रज्ज्वलित केले. सामान्य मावळ्यांना वीरांमध्ये परावर्तीत करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. शिवरायांमुळे हा भगवा झेंडा दिल्लीपासून अटकेपर्यंत लागला. संपूर्ण भारतावर छत्रपतींमुळे भगव्याचा अंमल आला, असे फडणवीस यांनी सांगितले.

दिल्लीतही छत्रपतींचे स्मारक झाले पाहिजे
‘‘उदयनराजेंच्या मागण्यांसंदर्भात आम्ही योग्य ती कारवाई करणार आहोत. शिवरायांचा अवमान करणा-यांना टकमक टोकावरून लोटून दिले पाहिजे. पण, आपण लोकशाहीत आहोत. लोकशाही अनुरूप याठिकाणी नियम करण्याचे काम करू. अरबी समुद्रातील स्मारकाचे काम सर्वोच्च न्यायालयात अडकले होते. ते उच्च न्यायालयात पाठवले आहे. उच्च न्यायालयात लढून ते स्मारक मोकळे करून घेऊ. कुठल्याही परिस्थितीत शिवरायांचे स्मारक झाले पाहिजे, हा प्रयत्न आपला आहे. दिल्लीतही छत्रपतींचे स्मारक झाले पाहिजे, यासाठी अमित शहा यांच्याशी चर्चा करून त्यांची मदत घेऊन राष्ट्रीय स्मारक करू,’’असे आश्वासन फडणवीसांनी दिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR