छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
शहरामध्ये अवैध वाळू कारभाराविरोधात तक्रार करण्यासाठी गेलेल्या तहसीलदारांचीच जीप पोलिस उपनिरीक्षकाने जप्त केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेरले आहे.
अंबादास दानवे यांनी दै. ‘सामना’मध्ये छापून आलेले वृत्त आपल्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून शेअर करत गृहमंत्री फडणवीस यांना सवाल केला आहे. आता कुंपणच शेत खात असेल तर कायदा-सुव्यवस्था बिघडायला अजून दुसरं कोण हवं! नांदेडमध्ये नुकतेच पोलिसांनी अवैध वाळू उपशाचा तब्बल २ कोटींचा मुद्देमाल जप्त केला. छत्रपती संभाजीनगरात मात्र उलटी गंगा वाहते आहे. इथे अवैध वाळू कारभाराच्या विरोधात उभ्या अधिका-यांना पोलिस कर्मचा-यांकडून धमकावले जाते. चक्क सरकारी गाड्या जप्त होतात. चाललेय काय गृहमंत्री महोदय, असा सवाल दानवे यांनी केला.
वाळूचोरी रोखण्यासाठी गेलेल्या महसूल अधिकारी-कर्मचा-यांना कधी जीवे मारण्याची धमकी तर कधी त्यांच्या अंगावर वाहने घालण्याच्या अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत, मात्र छत्रपती संभाजीनगरात यापेक्षाही भयंकर घटना समोर आली आहे. चक्क पोलिस कर्मचा-याकडूनच वाळूची तस्करी केली जात असून, वाळूच्या हायवावर कारवाई करणा-या तहसीलदारांनाच धमकावून या पोलिस कर्मचा-यासह सुमारे १५० वाळूतस्करांनी राडा घातला.
विशेष म्हणजे या संदर्भात तक्रार देण्यासाठी गेलेल्या तहसीलदारांची तक्रार घेण्याऐवजी तेथील पोलिस उपनिरीक्षकाने तहसीलदारांची सरकारी जीप जप्त केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पोलिस आयुक्तांशी चर्चा करून त्या पोलिस उपनिरीक्षकासह वाळूतस्कर असलेल्या पोलिस कर्मचा-यावर कारवाई करण्यासंदर्भात पत्र दिले आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरात रात्री रंगलेल्या हायहोल्टेज ड्राम्यामुळे सरकारची लक्तरे वेशीवर टांगली गेली असून, अख्खे प्रशासन यामुळे सुन्न झाले आहे. वाळूमाफियांकडून कारवाईसाठी आलेल्या महसूल अधिकारी-कर्मचा-यांना जीवे मारण्याच्या घटना घडत आहेत, मात्र कायद्याचा रक्षक असलेल्या या पोलिस कर्मचा-यानेच वाळू तस्करी सुरू करीत तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी असलेल्या अधिका-याला थेट आव्हान दिल्याने घटनेचे गांभीर्य वाढले आहे. या घटनेसंदर्भात जिल्हाधिकारी यांना दिलेल्या अहवालानुसार तहसीलदार रमेश मुंडलोड सरकारी कामकाज आटोपून गुरुवारी रात्री घराकडे जात असताना त्यांना गारखेडा परिसरातील विजय चौकात वाळू वाहतूक करणारा हायवा निदर्शनास आला होता.