18.3 C
Latur
Tuesday, January 6, 2026
Homeमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरात चेंगराचेंगरी; ३ महिला बेशुद्ध

छत्रपती संभाजीनगरात चेंगराचेंगरी; ३ महिला बेशुद्ध

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरात पाच हजाराची साडी ५९९ रुपयांत मिळणार या ऑफर्समुळे महिलांच्या झालेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. चेंगराचेंगरीत लहान मुलांची आईपासून ताटातूट आणि ३ जणी बेशुद्ध पडल्या. अखेर पोलिसांनी तातडीने दुकान बंद पाडल्यानंतर गर्दी कमी झाली. मकरसंक्रांतीनिमित्त साड्यांवरील मोठ्या सवलतींच्या ऑफर्समुळे रविवारी संभाजीनगर शहरातील आकाशवाणी ते त्रिमूर्ती चौक परिसरात थरार पाहायला मिळाला.

५ हजार रुपयांची साडी अवघ्या ५९९ रुपयांत मिळणार या बातमीने तब्बल १०० हून अधिक महिला आणि मुलींनी एकाच वेळी दुकानावर गर्दी केली. या तुफान गर्दीत झालेल्या चेंगराचेंगरीत ३ महिला श्वास गुदमरून बेशुद्ध पडल्या, तर अनेक लहान मुलांची आईपासून ताटातूट झाल्याने परिसरात एकच घबराट पसरली. त्रिमूर्ती रोडवरील या नवीन साडी सेंटरचे रविवारी उद्घाटन होते.

गेल्या ३ महिन्यांपासून स्थानिक रीलस्टार्समार्फत १९९ ते ५९९ रुपयांमधील साड्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले जात होते. सकाळी १० वाजेपासूनच महिलांच्या रांगा लागल्या होत्या. ११ वाजता उद्घाटन होऊन दुकान उघडताच महिलांनी आत शिरण्यासाठी एकच गर्दी केली. काही वेळातच रस्ता पूर्णपणे जाम झाला आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली.

पोलिसांचा हस्तक्षेप, लाऊडस्पीकरवरून आवाहन-
दुकानात महिलांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने स्थानिक नागरिकांनी पोलिसांना कळवले. जवाहरनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन कुंभार यांनी तातडीने पथकासह धाव घेतली. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी माईकचा वापर केला. ‘ही ऑफर केवळ आजपुरती नसून ३६५ दिवस राहणार आहे,’ असे जाहीर केल्यानंतर आणि बळाचा वापर करण्याचा इशारा दिल्यानंतर दुपारी २ वाजता ही गर्दी निवळली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR