लातूर : प्रतिनिधी
अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे-पाटील यांच्यावर दि. २० जुलै रोजी येथील शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण व त्यांच्या सहकार्यांनी हल्ला केला. जबर मारहान करुन जखमी केले होते. याच्या निषेधार्थ व राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी छावा संघटनेने दि. २१ जुलै रोजी आक्रमक होत लातूर बंद केला. लातूरकरांनीही कडकडीत बंद पाळला. या बंदमध्ये सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्तेही सहभागी झाले होते.
राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे सभागृहात रमीचा ऑनलाईन गेम खेळतात. त्यांचा राजीनामा तात्काळ घ्यावा आणि त्यांना घरी बसून पत्ते खेळता यावे म्हणून पत्त्यांचा डाव, मागण्यांचे निवेदन विजयकुमार घाडगे-पाटील व त्यांच्या सहकार्यांनी रविवारी शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना दिले. निवेदन देऊन ते बाहेर पडत असताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण व त्यांच्या सहकार्यांनी विजयकुमार घाडगे-पाटील व त्यांच्या सहकार्यांना बेदम मारहाण केली.
या घटनेचा निषेध म्हणुन सोमवारी लातूर बंद पाळण्यात आला. या बंदमध्ये अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नानसाहेब जावळे-पाटील यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, अशोक हॉटेल, महात्मा गांधी चौक, मेन रोड, गंजगोलाई, जुने गुळ मार्केट, मार्केट यार्ड, महात्मा बसवेश्वर चौक, राजीव गांधी चौक, छत्रपती शिवाजी महराज चौक, संविधान चौक, पीव्हीआर चौक, परत छत्रपती शिवाजी महाराज चौक, जुना रेणापुर नाका, पु. अहिल्यादेवी होळकर चौक, परत छत्रपती शिवाजी महाराज चौक, अशी रॅली काढण्यात आली होती.