मुंबई : प्रतिनिधी
नागपूरच्या दंगलीचे खापर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘छावा’ चित्रपटावर फोडले, हे त्यांचे मनोबल कमजोर असल्याचे लक्षण आहे. दंगलीच्या गुन्हेगारांना सोडणार नाही, असे त्यांनी जाहीर केले. म्हणजे ते काय करणार? ‘छावा’ चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, औरंगजेबाची भूमिका करणारे नट यांच्यावर खटले दाखल करणार काय? कारण ‘छावा’मुळे दंगल झाली. आता या ‘छावा’ चित्रपटाचे खास शो मुख्यमंत्र्यांनीच ठेवले होते. भाजपा आणि संघ मंडळातर्फेही ‘छावा’चा प्रचार सुरूच होता, अशी खोचक टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
संभाजीराजांना औरंगजेबाने क्रूरपणे मारले, संभाजी महाराजांनी धर्मासाठी बलिदान दिले, पण औरंगजेबापुढे ते झुकले नाहीत, हा इतिहास महाराष्ट्राला ज्ञात आहे. जेथे संभाजीराजांची हत्या झाली तेथे स्मारक आहे. यावर ग्रंथ, पुस्तके, कादंब-या आहेत. पण ते वाचून दंगली भडकल्या आणि लोक कुदळ-फावडी घेऊन औरंगजेबाची कबर खोदायला निघाले, असे कधी घडले नाही.
संघाचे गोळवलकर गुरुजी आणि वीर सावरकरांनी त्यांच्या लिखाणात संभाजीराजांविषयी बरे म्हटलेले नाही. तरीही लोकांनी दंगली केल्या नाहीत. मग एक चित्रपट पाहून लोकांनी दंगली का कराव्यात? असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ दैनिकातील अग्रलेखाच्या माध्यमातून लगावला आहे.