धाराशिव : प्रतिनिधी
‘छावा’ चित्रपट टॅक्स फ्री करावा अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली. तर यावेळी त्यांनी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून सरकारवर मोठा आरोप केला. सोलापूरकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केले, मात्र त्यानंतर सरकारच्या आदेशामुळेच त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही, असा आरोप जरांगे पाटील यांनी केला.
दरम्यान, अभिनेता विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. हा सिनेमा सध्या थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे. अशातच आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शिवजयंतीच्या दिवशीच हा सिनेमा करमुक्त करून प्रेक्षकांना दिलासा देण्याची सरकारकडे मोठी मागणी केली आहे.
जिल्ह्यातील कळंब येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत, भगवा ध्वज फडकावत या उत्सवाची मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. यावेळी माध्यमांशी बोलताना पाटील यांनी ‘छावा’ चित्रपटाबाबत मोठी मागणी केली.