पुणे : छत्रपती संभाजी राजे यांच्या इतिहासावर आधारित छावा चित्रपट सध्या सर्वांच्याच पसंतीस उतरत आहे. इतिहासाची प्रतारणा न करता शंभूराजांच्या जीवनावर बनवलेल्या या चित्रपटाला टॅक्स फ्री करण्यात यावे, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे. मात्र हा चित्रपट टॅक्स फ्री करता येणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे आणि त्याचे कारण देखील त्यांनी सांगितले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थिती लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात हजेरी लावली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. फडणवीस म्हणाले, मी महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील शिवप्रेमींना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाच्या शुभेच्छा देत आहे. छत्रपती होते म्हणून आम्ही आहोत. महाराजांनी आम्हाला आत्माभिमान आणि आत्मतेज दिले. तसेच समतेचा संदेश दिला. अठरापगड जातींना एकत्र करून स्वराज्याची निर्मिती केली. त्यांनी त्याच स्वराज्याच्या निर्मितीमधून एकतेचा संदेश दिला.
दरम्यान ‘छावा’ चित्रपट टॅक्स फ्री करावा, अशी मागणी सर्वत्र करण्यात येत आहे. याबाबत राज्य शासन काही निर्णय घेणार आहे का? असा प्रश्न त्यांना विचारला असता फडणवीस म्हणाले, मला आनंद आहे की, छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित अतिशय चांगला आणि इतिहासाची कोणतीही प्रतारणा न करता हा चित्रपट बनवला आहे. त्यांची वीरता, शौर्य आणि विद्वत्ता प्रचंड होती. मात्र इतिहासाने त्यांच्यावर अन्याय केला. अतिशय चांगला आणि ऐतिहासिक असा हा चित्रपट बनला आहे. त्यासाठी मी पहिल्यांदा निर्माते, दिग्दर्शक आणि या चित्रपटामध्ये काम करणा-या अभिनेत्यांचे अभिनंदन करतो.
हा सिनेमा टॅक्स फ्री करावा अशी मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. परंतु महाराष्ट्राच्या जनतेला मी सांगू इच्छितो की इतर राज्य जेव्हा एखादा चित्रपट टॅक्स फ्री करतात तेव्हा ती राज्ये जो करमणूक कर आहे तो माफ करत असतात. मात्र महाराष्ट्र सरकारने २०१७ मध्ये निर्णय घेतला असून करमणूक कर हा कायमचा रद्द केला आहे. त्यामुळे आपल्याकडे करमणूक कर माफी देण्यासाठी तो करच नाही आहे. मात्र या चित्रपटाला अधिकाधिक प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी काय मदत करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करू असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.