मुंबई : प्रतिनिधी
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे राजीनामा दिल्यापासून सार्वजनिक स्थळी दिसले नाहीत, त्यावरून आता विरोधकांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. त्यापुढे जात संजय राऊतांनी जगदीप धनखड यांच्यासाठी ‘सुप्रीम’ शोध मोहीम सुरू करत मोठी खळबळ उडवून दिली आहे.
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा दिल्याच्या धक्क्यातून देश सावरलेला नाही. पावसाळी अधिवेशन सुरू होताच दिल्लीत कोणता ‘गेम’ झाला याची गोम काही समोर आली नाही. पण त्यांच्या तडकाफडकी राजीनाम्याने दिल्लीच्या राजकारणात काही तरी मोठी घडामोड घडली हे उघड गुपित कोणी सांगायला तयार नाही. विरोधक तर या राजीनाम्यामागील कारण समोर आणावे अशी वारंवार मागणी करत आहेत. त्यांनी राजीनामा देणं आणि तो तात्काळ मंजूर करून घेणं हा घटनावेग संशयाला जागा निर्माण करणारा असल्याचा विरोधकांचा दावा आहे. त्यातच आज खासदार संजय राऊत यांनी तर मोठा बॉम्ब टाकला. त्यांनी जगदीप धनखड कुठे गायब झाले याचा शोध घेणार असल्याचे सांगितले. त्यासाठीचा जालीम उपाय पण सांगितला.
पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी अनेक विषयांवर नेहमीप्रमाणे तुफान बॅटिंग केली. फ्रंटफुटवर खेळण्यात त्यांचा कोणी हात धरत नाही. आज त्यांनी विस्मृतीत गेलेला धनखड यांचा मुद्दा उकरून काढलाच. त्यांनी सत्ताधा-यांवर अचूक निशाणा धरला. २१ जुलैपासून धनखड हे काही केल्या दिसले नाहीत, असा चिमटा त्यांनी काढला. पावसाळी अधिवेशन सुरू होते. त्यावेळी त्यांची प्रकृती उत्तम होती संध्याकाळी ६ वाजता अचानक राजीनाम्याची बातमी आली. २१जुलैपासून आजपर्यंत धनखड कुठे आहेत? त्यांची प्रकृती कशी आहे? ते बरे आहेत ना? मुळात ते आहेत ना? याची माहिती आम्हाला हवी आहे असा प्रश्नांचा भडीमार राऊतांनी केला. ते चीन, रशियात तर नाहीत ना, असा सवाल त्यांनी केला.