मुंबई : प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या सारंगी वादनानं लाखो रसिकांना मंत्रमुग्ध करणारे पद्मविभूषण पंडित राम नारायण यांचे शुक्रवारी (८ नोव्हेंबर) रात्री मुंबईत निधन झाले. वयाच्या ९६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राम नारायण यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील एका महान कलाकारास आपण मुकलो आहोत, अशी भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.
मूळचे राजस्थानच्या उदयपूरमधील राम नारायण हे ५० च्या दशकात मुंबईत आले आणि एकल सारंगी वादक म्हणून त्यांनी मोठी लोकप्रियता मिळवली. त्यांनी सारंगी वादनाच्या विविध शैली विकसित करून जागतिक स्तरावर कीर्ती मिळवली. संगीत क्षेत्रातील नवनव्या कलाकारांना पंडित राम नारायण यांचे कार्य नेहमीच प्रेरणा देणारे ठरेल, असे मत मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोक संदेशात व्यक्त केले आहे.