25 C
Latur
Saturday, October 5, 2024
Homeअंतरराष्ट्रीयजगातील पहिले एआय रुग्णालय बीजिंगमध्ये!

जगातील पहिले एआय रुग्णालय बीजिंगमध्ये!

बिजींग : वृत्तसंस्था
आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय ने जगभरातील तंत्रज्ञानात मोठा बदल घडवून आणला आहे. तसेच एआयमुळे खूप सा-या गोष्टी सोप्या झाल्या आहेत. तंत्रज्ञानाच्या युगात अमूलाग्र बदल घडवणा-या एआयने आता वैद्यकीय क्षेत्रात पाऊल टाकले आहे. चीनची राजधानी बीजिंगमध्ये जगातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स रुग्णालय सुरू झाले आहे. ‘एजंट हॉस्पिटल’ असे या रुग्णालयाचे नाव आहे. सिंघुआ विद्यापीठाच्या संशोधकांनी त्याची निर्मिती केली.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स रुग्णालयात १४ एआय डॉक्टरांसह ४ परिचारिका आहेत. हे डॉक्टर दररोज ३ हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार करण्यास सक्षम आहेत. या डॉक्टरांची रचना रोगांचे निदान करण्यासाठी, उपचार योजना तयार करण्यासाठी आणि परिचारिकांना दैनंदिन आधार देण्यासाठी करण्यात आली आहे. तसेच ही प्रणाली प्रथम वैद्यकीय विद्यापीठांना मदत करण्यासाठी वापरली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. एआय रुग्णालयामुळे रुग्णांवर उपचार करणे तर सोपे जाणारच आहे. परंतु रुग्णांवर योग्य ते उपचार करण्यास मदत होणार आहे. मात्र, ऑपरेशनसाठी रोबोट व्यवस्थित हाताळावे लागणार आहे, हेही तितकेच महत्त्वाचे आहे.

संशोधकांच्या मते हे एआय डॉक्टर जगातील कोणत्याही प्रकारच्या साथीच्या रोगाचा प्रसार आणि त्यांचे उपचार इत्यादींबाबत माहिती देऊ शकतील. एजंट हॉस्पिटलने अमेरिकन वैद्यकीय परवाना परीक्षेच्या प्रश्नांची उत्तरे ९३.६ टक्के अचूकतेने दिली आहेत. एजंट रुग्णालयाचे लिऊ यांग म्हणाले की, वैद्यकीय विद्यार्थ्यांनाही या भविष्यकालीन आभासी हॉस्पिटलमधून खूप काही शिकायला मिळेल. तसेच लोकांना कमी खर्चात दर्जेदार वैद्यकीय उपचार मिळू शकतील. त्यांच्या मदतीने अधिकाधिक लोकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देता येतील. येत्या काही दिवसांत हे रुग्णालय सुरू होणार आहे, असे सांगण्यात आले.

एआय रोबोटस्
कारमध्ये भरतात इंधन
आजपर्यंत कधीच रोबोटला कारमध्ये इंधन भरताना तुम्ही पाहिले नसेल. तुम्ही अगदी हॉलिवूड चित्रपटांत कार चालकाला इंधन भरताना पाहिले असेल. असे अनेक देश आहेत जिथे इंधन भरण्यासाठी लोकांना कामावर ठेवले जाते. असे काही देश आहेत जिथे कारमध्ये इंधन भरण्यासाठी मानव नव्हे तर रोबोटचा वापर केला जातो. अबुधाबी, संयुक्त अरब अमिराती आदी देशांत याचा वापर होतो. यासाठी एआयची मदत घेण्यात आली आहे.

इंधन स्टेशनवर झाली सोय
अबुधाबी, संयुक्त अरब अमिराती येथील नॅशनल ऑइल कंपनीने वाहनांमध्ये इंधन भरण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स उर्फ एआयच्या मदतीने एआय रोबोट तयार केला आहे. हा एआय रोबोट इंधन स्टेशनवर अगदी सहजतेने वाहनांमध्ये इंधन भरण्यास सक्षम आहे. त्यामुळे ग्राहकांची सोय झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR