नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अनेक प्रगत देशांमध्ये वैयक्तिक स्वातंत्र्य, बदललेली जीवनशैली यामुळे घटस्फोटांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. भारतात मध्येही हे प्रमाण कमालीचे वाढताना दिसत आहे. मात्र आजही कौटुंबिक आणि सामाजिक बंधनांमुळे वैवाहिक नाते टिकवण्याकडे जोडप्यांचा कल असल्याचे दिसून येते.
जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भारतामध्ये घटस्फोटांचे प्रमाण फार कमी आहे. त्याशिवाय आयर्लंड, कतार, यूएई आदि देशांमध्येही घटस्फोटांचे प्रमाण हे इतर देशांच्या तुलनेने कमी आहे. जगात सर्वात कमी घटस्फोट होणा-या देशांमध्ये आपल्या भारताशेजारील श्रीलंका या देशाचा पहिला क्रमांक लागतो. येथे दर हजार लोकांमागे केवळ ०.१५ टक्के घटस्फोट होतात. त्या खालोखाल व्हिएतनाम आणि ग्वाटेमाला या देशांचा दुसरा क्रमांक लागतो. तिथे घटस्फोटांचे प्रमाण हे दरहजारी ०.२ एवढंच आहे. त्यानंतर सेंट व्हिसेंट आणि ग्रेनाडाइन्स हे देश असून, घटस्फोटांचे प्रमाण दर हजारी ०.४ एवढंच आहे. धार्मिक श्रद्धा, प्रथा परंपरा आणि घटस्फोटाबाबत कठोर कायदे यामुळे इथे घटस्फोटांचे प्रमाण नगण्य आहे.
याउलट गुआम, मालदीव आणि ग्रीनलँडसारख्या देशांमध्ये घटस्फोटाचा दर खूपच अधिक आहे. येथील लोक वैवाहिक जीवनापेक्षा वैयक्तिक जीवन आणि आनंदाला प्राधान्य देतात. येथील कायदे घटस्फोट घेणा-यांसाठी ब-यापैकी सुलभ आहेत.