16.2 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeआरोग्यजनआरोग्य योजनेअंतर्गत सर्वांनाच आरोग्य विमा

जनआरोग्य योजनेअंतर्गत सर्वांनाच आरोग्य विमा

सरकारचे गिफ्ट, १ जुलैपासून लागू होणार योजना

मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने विधानसभा निवडणुकांआधी राज्यातील नागरिकांना मोठे गिफ्ट दिले आहे. आता राज्यातील नवी आरोग्य विमा योजना महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना सर्वांसाठी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकारने या योजनेचा वार्षिक प्रीमियम ६० टक्क्यांनी वाढवून तो ३००० कोटी रुपयांहून अधिक केला आहे. नवी योजना १ जुलैपासून लागू होणार आहे.

नव्या आरोग्य विमा योजनेअंतर्गत राज्यातील सर्व नागरिकांना आता दीड लाखांऐवजी पाच लाख रुपयांचा विमा कव्हर मिळेल. २०१२ मध्ये ही योजना लाँच करण्यात आली होती. त्यानंतर आता १२ वर्षांनी या योजनेत इतका मोठा बदल करण्यात आला. या योजनेसाठी राज्य सरकारने नुकतीच निविदा प्रक्रिया निकाली काढली आहे. यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनी युनायटेड इंडिया इन्शूरन्सची निवड करण्यात आली आहे. राज्यातील १२.३ कोटी कुटुंबांसाठी सरकार प्रतिकुटुंब १३०० रुपये प्रीमियम भरणार आहे. सरकारी आकडेवारीनुसार २०२३-२४ मध्ये ५.७ लाख कुटुंबांनी या योजनेचा लाभ घेतला.

दरम्यान, मागील वर्षी जूनमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतील विमा रक्कम १.५ लाख रुपयांनी वाढवून ५ लाखांची घोषणा केली होती, पण हे लागू करण्यात आले नव्हते. आता विधानसभा निवडणुकांआधी महाराष्ट्र सरकारने निवडणूक आयोगाला ही योजना लागू करण्यासाठी पत्र लिहून परवानगी मागितली होती. आता आचारसंहिता संपल्यानंतर सरकारने ही योजना अंतिम टप्प्यात आणली. मिळालेल्या महितीनुसार आता ही योजना १ जुलैपासून नव्या स्वरुपात पुन्हा लाँच होणार आहे.

सर्वांसाठी समान योजना
नवी योजना लागू होण्याआधी विमाधारकांना याचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड आणि एक लाखांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र द्यावे लागत होते. मात्र आता सरकारने हे कागदपत्र जमा करणे गरजेचे नसून सर्व नागरिकांसाठी समान योजना लागू करण्याचे सांगितले आहे. आता उत्पन्नांचीही कोणतीही मर्यादा ठेवण्यात आलेली नाही. या योजनेंतर्गत १००० रुग्णालये होती. मात्र, आता वाढवून ती १९०० करण्यात आली आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR