न्यूयॉर्क : वृत्तसंस्था
जगभरात कॅन्सरचे रुग्ण वाढत असताना त्याचे लवकर निदान न होणे धोकादायक असते. मात्र, आता एखाद्या व्यक्तीला जन्माला येण्यापूर्वीच कर्करोगाचा धोका किती आहे, हे कळू शकते. अमेरिकन शास्त्रज्ञांनी केलेल्या नव्या संशोधनातून हे समोर आले आहे.
नेचर कॅन्सर जर्नलमध्ये प्रकाशित संशोधनानुसार, दोन वेगवेगळ्या एपिजेनेटिक स्थिती ओळखल्या असून, यात व्यक्तीला कॅन्सरचा धोका किती हे कळते. हे एपिजेनेटिक्स व्यक्तीमध्ये पहिल्याच स्टेजमध्ये विकसित होतात. याद्वारे, डीएनए न बदलता नियंत्रित केल्या जातात. यापैकी एका स्थितीत कर्करोगाचा धोका कमी होतो तर एका स्थितीत कर्करोगाचा धोका वाढतो.
१ कोटी मृत्यू हे २०२० मध्ये जगभरात कॅन्सरने झाले आहेत. कर्करोग हे जगभरातील मृत्यूंचे एक प्रमुख कारण आहे. मृत्यूपैकी एक मृत्यू हा कॅन्सरने होतो. स्तन, फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याचे प्रमाण वाढले आहे. १/३ मृत्यू हे तंबाखूचे सेवन, अधिक बीएमएआय, मद्यपान, कमी फळे आणि भाज्यांचे सेवन आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे होतात.
मिशिगनमधील व्हॅन अँडेल इन्स्टिट्युटच्या संशोधकांच्या म्हणण्यानुसार, कमी जोखीम असलेल्या लोकांमध्ये ल्युकेमियासारख्या द्रव ट्यूमर विकसित होण्याचा धोका जास्त असतो. उच्च-जोखीम असलेल्या परिस्थितीत, फुफ्फुस किंवा प्रोस्टेट कर्करोगाचा धोका असतो.
संशोधनात उंदरावर प्रयोग करण्यात आले. यात ट्रिम-२८ जनुकाची कमी पातळी असलेल्या उंदरांमध्ये कर्करोगाशी संबंधित जनुकांवर एपिजेनेटिक मार्कर दोन भिन्न पॅटर्नमध्ये आढळून आले. हे पॅटर्न सुरुवातीच्या टप्प्यात विकसित होतात. प्रत्येक असामान्य पेशी कर्करोगात बदलत नाही; असे संशोधनात आढळून आले.