टोयोके : वृत्तसंस्था
जपानमधील टोयोके शहरात स्मार्टफोनच्या वापराबाबत एक नवीन नियम लागू होणार आहे. याअंतर्गत, शहरातील रहिवासी आता दररोज फक्त दोन तास स्मार्टफोन वापरू शकतील.
जगभरात स्मार्टफोन वापरणा-यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आता स्मार्टफोनचे व्यसन लागले आहे. मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी, लोकांच्या आरोग्यासाठी, मानसिक आरोग्यासाठी आणि तुटलेल्या नातेसंबंधांना पुन्हा रुळावर आणण्यासाठी तज्ज्ञांनी स्क्रीन टाइम कमी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे, जगभरात स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. काही दिवसापूर्वी जपानमधील एका शहरात फोन वापरण्याबाबत एक नियम लागू केला आहे. यामध्ये आता लोक दिवसातून फक्त दोन तास स्मार्टफोन वापरू शकतील, असे म्हटले आहे.
जपानच्या टोयोके शहरातील रहिवासी आता दिवसातून फक्त दोन तास स्मार्टफोन वापरणार आहेत. शहर प्रशासन लवकरच एका मसुदा अध्यादेशावर मतदान करेल जो रहिवाशांना कामाच्या आणि शाळेच्या जबाबदा-यांव्यतिरिक्त स्मार्टफोन, टॅब्लेट आणि संगणकांवर दोन तास घालवण्याची परवानगी देईल, अशी घोषणा टोयोकेचे महापौर मासामी कोकी यांनी केली.
जर नियमावर सहमती झाली तर तो ऑक्टोबरपासून टोयोकेमध्ये लागू केला जाईल. असा नियम २०२० मध्ये जपानी शहर कागावा येथे आधीच बनवण्यात आला आहे आणि अंमलात आणण्यात आला आहे. या अध्यादेशाचे उल्लंघन केल्यास कोणताही आर्थिक किंवा फौजदारी दंड आकारला जाणार नाही, असे कोकी यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, स्क्रीन टाइम दोन तासांपर्यंत मर्यादित ठेवणे हे केवळ एक मार्गदर्शक तत्त्व आहे. या विधेयकाचे उद्दिष्ट रहिवाशांना त्यांच्या आरोग्यावर आणि दैनंदिन जीवनावर होणा-या स्मार्टफोनच्या अतिवापराच्या नकारात्मक परिणामांपासून सुरक्षित ठेवणे आहे.
जपानच्या टोयोके शहरात फोनबाबत बनवण्यात येणा-या नियमांमध्ये शिक्षा किंवा दंडाची कोणतीही तरतूद नसली तरी, हे नियम केवळ लोकांना जागरूक करण्यासाठी बनवण्यात आले आहेत, तरीही लोक संतापले आहेत.