डोडा : जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात आज सकाळी शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यादरम्यान २ दहशतवादी मारले गेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गंडोह भागातील बाजड गावात लष्कर आणि केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरएफ)च्या जवानांनी स्थानिक पोलिसांसह संयुक्तपणे शोध मोहीम राबवली असता सकाळी ९.५० वाजता ही चकमक झाली. सुरक्षा दलांकडून अजूनही या परिसरात कारवाई सुरू आहे.
दरम्यान, ११ आणि १२ जून रोजी झालेल्या दुहेरी दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी डोडा येथे शोध मोहीम तीव्र केली आहे. ११ जून रोजी चत्तरगल्ला येथील संयुक्त चेक पोस्टवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता, ज्यामध्ये ६ सुरक्षा कर्मचारी जखमी झाले होते. तर दुस-या दिवशी १२ जून रोजी गंडोह भागातील कोटा टॉप येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक पोलिस जखमी झाला. लष्कराच्या म्हणण्यानुसार, या परिसरात ४ पाकिस्तानी दहशतवादी लपले आहेत. त्यांच्यावर प्रत्येकी ५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.