26.6 C
Latur
Tuesday, September 24, 2024
Homeराष्ट्रीयजम्मू-काश्मीरमध्ये दुस-या टप्प्यात २६ जागांसाठी उद्या होणार मतदान

जम्मू-काश्मीरमध्ये दुस-या टप्प्यात २६ जागांसाठी उद्या होणार मतदान

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुस-या टप्प्यातील मतदान बुधवारी, २५ सप्टेंबर रोजी होणार आहे. यावेळी सहा जिल्ह्यांतील २६ मतदारसंघांमध्ये मतदान होणार असून त्यापैकी १५ जागा मध्य काश्मीरमध्ये तर ११ जागा जम्मूमध्ये आहेत. दुस-या टप्प्यात एकूण २३९ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये २३३ पुरुष आणि ६ महिलांचा समावेश आहे. दुस-या टप्प्यात १३१ उमेदवार करोडपती असून, ४९ उमेदवारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला गांदरबल आणि बीरवाह येथून निवडणूक लढवत आहेत.

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुस-या टप्प्याचा प्रचार सोमवारी संध्याकाळी संपला. प्रचाराच्या दुस-या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्ताधारी पक्षासाठी दोन सभा घेतल्या, तर राहुल गांधी यांनी काँग्रेस आणि आघाडीसाठी मते मागितली. १९ सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदी यांनी श्रीनगरमध्ये आणि रियासी जिल्ह्यातील कटरा येथे दोन सभा घेतल्या होत्या. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजौरी, मेंढर, सुरनकोट, थानामंडी आणि नौशेरा येथे प्रचारसभा घेतल्या. तर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे स्टार प्रचारकांमध्ये होते. राहुल गांधी यांनी दोन सभा घेतल्या त्यामधील एक पूंछच्या सुरनकोट मतदारसंघात आणि दुसरी सभा श्रीनगरच्या सेंट्रल-शाल्टेंगमध्ये घेतली.

१९ सप्टेंबर रोजी झालेल्या पहिल्या टप्प्यात सुमारे ६१.३८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, तर उर्वरित ४० विधानसभा मतदारसंघांसाठी तिस-या आणि अंतिम टप्प्यातील मतदान १ ऑक्टोबर रोजी होणार आहे. तर मतमोजणी ८ ऑक्टोबर रोजी होणार आहे. जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर आणि ऑगस्ट २०१९ मध्ये त्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमधील ही पहिली विधानसभा निवडणूक आहे. मागील विधानसभा निवडणूक २०१४ मध्ये झाली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR