18.2 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeजम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच एक संविधान, एक तिरंग्याखाली मतदान

जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच एक संविधान, एक तिरंग्याखाली मतदान

अमित शहांचा विरोधी पक्षांवर हल्लाबोल

जम्मू : वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमध्ये तब्बल १० वर्षांनंतर पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. याच पार्श्वभूमीवर काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे संकल्पपत्र प्रसिद्ध केले. यानंतर आज (शनिवारी) अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना दहशतवाद, पाकिस्तान आणि विरोधी पक्षांवरही जोरदार हल्लाबोल केला.

जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर संपूर्ण काश्मीरमध्ये पहिल्यांदाच निवडणुका होत आहेत. स्वतंत्र भारतात पहिल्यादाच या ठिकाणी राष्ट्रध्वजाखाली मतदान होत आहे, असे अमित शाह म्हणाले.

अमित शाह यांनी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस पक्षावरही जोरदार हल्लाबोल केला. कलम ३७० हटवल्यानंतर ७० वर्षांनंतर जम्मू-काश्मीरमधील लोकांना त्यांचे अधिकार मिळाले आहेत. पण, या दोन्ही पक्षांना तुमचा हक्क पुन्हा हिसकावून घ्यायचा आहे. हे असे असावे का? असा सवाल अमित शाह यांनी केला. यावेळी त्यांनी पाकिस्तानला आव्हानही दिले. जोपर्यंत येथे शांतता प्रस्थापित होत नाही, तोपर्यंत पाकिस्तानशी चर्चा होऊ शकत नाही, असे अमित शाह म्हणाले.

नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसला तुरुंगात असलेल्या लोकांची सुटका करून खो-यातील वातावरण पुन्हा बिघडवायचे आहे, असे अमित शाह म्हणाले. तसेच, विरोधकांना जम्मू, पुंछ, राजौरी सारख्या भागात पुन्हा शांतता भंग करायची आहे. पण इथली जनता हे सगळे होऊ देतील का? असा सवाल अमित शाह यांनी केला.

जम्मू-काश्मीरला वेगळ्या राज्याचा दर्जा देण्याच्या विरोधकांच्या आश्वासनावरही अमित शाह यांनी हल्लाबोल केला. ते म्हणाले की, विरोधी पक्षनेते मी आधीच सांगितलेल्या गोष्टीची पुनरावृत्ती करत आहेत. त्यांनी ५ आणि ६ ऑगस्ट रोजी माझे भाषण ऐकावे. निवडणुकीनंतर जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळेल, असे मी म्हटले होते. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस दोन्ही पक्ष म्हणतात की आम्ही जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा देऊ. पण, जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा परत कसा देणार? केवळ भारत सरकारच राज्याचा दर्जा देऊ शकते, असे अमित शाह यांनी सांगितले. मोदी सरकारने आपल्या कार्यकाळात येथे एम्स, आयआयटी आणि महाविद्यालये दिली. आज जम्मू-काश्मीरमधून दहशतवाद नष्ट केला जात आहे. मोदी सरकारच्या काळातच हे शक्य झाले, असेही अमित शाह म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR