सातारा : प्रतिनिधी
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आले आहेत. जयकुमार गोरे यांचा मुलगा आदित्यराज याने सातारा-कोल्हापूर रोडवर जीवघेणे स्टंट करत स्वत: सोबत इतर लोकांच्या जीविताला धोका निर्माण केला आहे. याबाबतचे आदित्यराज याच्या स्टंटचे काही फोटो आणि व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
दरम्यान मंत्री जयकुमार गोरे यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. यामुळे ते सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेत आले आहेत. अशातच आता त्यांच्या मुलाचा प्रताप समोर आला आहे. ज्यामुळे ते अडचणीत येण्याची शक्यता आहे. एकीकडे या कारणांनी राजकीय वर्तुळात जयकुमार गोरे चर्चेत असतानाच आता ते त्याच्या मुलामुळे गोत्यात येण्याची शक्यता आहे. भैय्या पाटील यांनी एक्सवर पोस्टवरून राज्य सरकार आणि मंत्री जयकुमार गोरे यांना सवाल केला आहे.
भैय्या पाटील यांनी केलेल्या या पोस्टमुळे आता टीकेची झोड उठली असून सर्वसामान्य असता तर भला मोठा दंड आणि कारावासाची शिक्षा झाली असती, असे बोलले जात आहे. दरम्यान आता आदित्यराज गोरे याने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेला व्हीडीओ डिलीट केला आहे.
काहीच दिवसांपूर्वी एका महिलेचा मुद्दा चांगलाच गाजला होता, ज्यामुळे त्यांच्यावर अधिवेशनात टीका झाली होती. यावरून त्यांनी खासदार संजय राऊत आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर हक्कभंग आणला होता.
आदित्यराज्य याने लाईव्ह स्टंट करत स्वत:च्या सोशल मीडियावर टाकले आहेत. अशा बेकायदेशीर गोष्टीला प्रोत्साहित केले जात असल्याचा आरोप भैय्या पाटील यांनी केला आहे. तर या बाईकला नंबर प्लेटसुद्धा नसून कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे यांच्या मुलासाठी महाराष्ट्रात राज्य सरकारने वेगळे नियम आणि कायदे बनवले आहेत का? असा सवाल देखील त्यांनी केला आहे.
तसेच जर हेच कृत्य सर्वसामान्य व्यक्तीने केले तर त्याची गाडी जप्त करून मोठा दंड ते ३ महिन्यांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा केली गेली असती, असेही भैय्या पाटील यांनी म्हटले आहे. तर याच मुद्यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गोरे यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.