जयपूर : वृत्तसंस्था
साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी चार दहशतवाद्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जयपूरच्या विशेष न्यायालयाने मोहम्मद सैफ, मोहम्मद सरवर आझमी, सैफुर्रहमान आणि शाहबाज अहमद यांना दोषी ठरवले होते. यानंतर त्यांना मंगळवारी (८ एप्रिल) ही शिक्षा सुनावण्यात आली.
१३ मे २००८ रोजी जयपूर येथे एकापाठोपाठ एक असे आठ बॉम्बस्फोट झाले होते. एक बॉम्ब चांदपोल बाजारातील एका मंदिराजवळ सापडला होता. जो निकामी करण्यात आला. या साखळी बॉम्बस्फोटात ७१ जणांचा मृत्यू झाला होता.
जयपूर बॉम्बस्फोटाशी संबंधित प्रकरणांत चौघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. यानंतर, राजस्थान उच्च न्यायालयाने मार्च २०२३ मध्ये सर्वांना निर्दोष सोडले होते. १७ वर्षे जुन्या या प्रकरणात, सरकारी वकिलांनी ११२ साक्षीदारांचे जबाब नोंदवले, तर सुमारे १२०० कागदपत्रे न्यायालयात सादर केली. यानंतर न्यायालयाने मंगळवारी (८ एप्रिल) ६०० पानांचा निकाल दिला.
तीन आरोपी अद्यापही फरार
या प्रकरणात पोलिसांनी एकूण १३ जणांना आरोपी केले होते. यांतील तीन जण अद्यापही फरार आहेत. अन्य दोन जण हैदराबाद आणि दिल्लीतील कारागृहात आहेत. तर दोन जण दिल्लीतील बाटला हाऊस एन्काउंटरमध्ये मारले गेले होते.